भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
By धीरज परब | Updated: September 29, 2025 22:19 IST2025-09-29T22:18:27+5:302025-09-29T22:19:01+5:30
काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आले आरोप

भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
धीरज परब, लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड: विधानसभा निवडणुकीवेळी मतदारयादीत मोठ्या प्रमाणात घोटाळे करून बोगस मतदानासह वोटचोरी झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. निवडून आलेल्या भाजपा आमदाराच्या जवळच्या पदाधिकाऱ्याने सहकुटुंब मीरा भाईंदरमध्ये तीन ठिकाणी मतदार यादीत नावे असल्याचे काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. इतकेच नव्हे तर मीरारोडमधील एका दुकानाच्या पत्त्यावर तब्बल २५ मतदारांची नोंद केली गेल्याचेही सांगण्यात आले.
काँग्रेस नेते मुझफ्फर हुसेन सह जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत, आफरीन सय्यद, प्रकाश नागणे, ऍड. राहुल राय, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष सिद्धेश राणे, दीपक बागरी, जय ठाकूर आदींनी सोमवारी सायंकाळी मीरारोड येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी विधानसभा निवडणुकी आधी मीरा भाईंदर शहरातील १४५ आणि १४६ मतदार संघातील ९० हजार मतांची गडबडी असल्याची तक्रार काँग्रेसने गेल्या वर्षी दिली होती. त्याचे उत्तर आयोगा कडून आता मिळाले असून त्यात आहे मीरा भाईंदर १४५ विधानसभा मतदारसंघात ५३ हजार ५४८ मतांची वाढ झाल्याचे तसेच ४,९१३ मतदार वगळले असल्याचे कळवले आहे.
बोगस मतदार नोंदणी, प्रत्यक्ष रहात असलेल्या मतदारांची खात्री न करताच चुकीच्या व दुबार नावांची नोंद, मानमर्जीने अनेकांची नावे परस्पर काढून टाकणे आदी अनेक आरोप यावेळी पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगावर केले गेले. आयोगा कडे उत्तर मागितले असता भाजपा आमदार उत्तर देतात या बद्दल हुसेन यांनी आश्चर्य व्यक्त केले. आम्ही आयोगाला विचारणा केली असता भाजपाचे लोकं फुकटची प्रवक्तेगिरी कशाला करतात असा टोला त्यांनी लगावला.
दीपक बागरी यांनी सांगितले कि, आ. नरेंद्र मेहतांचे निकटवर्ती भाजपा पदाधिकारी रविकांत रामप्रकाश उपाध्याय हे २०१७ पासून भाईंदरच्या गोल्डन नेस्ट भागात रहात असून ओवळा माजिवडा १४६ मद्ये त्यांचे व पत्नीचे नाव आहे. तसे असताना मीरा भाईंदर मतदार संघात उपाध्याय व पत्नीचे म्हाडा, पूनम कॉम्प्लेक्स आणि भाईंदरच्या भीमनाथ इमारतीच्या पत्त्यांवर देखील मतदार यादीत फोटो सह नांवे असल्याचे दाखवले. म्हणजेच खोटी कागदपत्रे, फेक आयडी बनवून भाजपाचेच पदाधिकारी बोगस मतदार यादीत असल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्याची मागणी बागरी यांनी केली. अशी हजारो नावे असून माहिती अधिकारात देखील याची माहिती देण्यास आयोग टाळाटाळ करत आहे.
मीरारोडच्या पूनम सागर कॉम्प्लेक्स मधील अस्मिता उपहार इमारतीच्या दुकान क्रमांक ११ ह्या पत्त्यावर तब्बल २५ मतदारांची नावे असून वेगवेगळ्या आडनावांच्या ह्या मतदारांची मतदार ओळखपत्रे देखील आयोगाने दिली आहेत असे जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांनी त्याच्या टपाल प्रति वाचून दाखवल्या.
भाजपा पदाधिकाऱ्याच्या अनेक ठिकाणी मतदार यादीतील नावा वरून बोगस वोटर व नोंदणी, वोटचोरी करून भाजपाच्या उमेदवारास मतांचा फायदा करून देण्यासाठी हे कारस्थान निवडणूक आयोग, बीएलओ आदींनी भाजपाशी मिळून केल्याचे शिक्कामोर्तब होत असल्याचे यावेळी सामंत म्हणाले.