'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 09:49 IST2025-09-18T09:42:01+5:302025-09-18T09:49:47+5:30
या निवडणुकीत पहिल्यांदाच भाजपा, मनसे आणि उद्धवसेना एकत्र येऊन शिंदेसेनेला थेट आव्हान देत असल्याने या निवडणुकीकडे ठाण्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
ठाणे - मुंबई क्रिकेट संघटनेला संलग्न असलेल्या शतायुषी स्पोर्टिंग क्लबच्या त्रैवार्षिक निवडणुकीत यंदा राजकीय रंग चढला आहे. येत्या शुक्रवार १९ सप्टेंबरला होणाऱ्या निवडणुकीत भाजपा-मनसे-उद्धवसेना यांचे एकत्रित पॅनल विरुद्ध शिंदेसेना समर्थित पॅनल अशी चुरस रंगणार आहे.
क्लबचे १५७ सदस्य एकूण १८ उमेदवारांमधून ९ कार्यकारणी सदस्य निवडण्यासाठी मतदान करणार आहेत. या निवडणुकीत सुरुवातीला २४ उमेदवार रिंगणात होते. मात्र ६ जणांनी अर्ज मागे घेतल्याने आता १८ उमेदवार शिल्लक आहेत. विसर्जित कार्यकारणीतील ९ पैकी ८ सदस्यांनी पुन्हा रिंगणात उडी घेतली आहे. क्लबच्या इतिहासात यंदा विशेष म्हणजे सुषमा माधवी या एकमेव महिला उमेदवार मैदानात आहेत.
सरत्या कार्यकारणी मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजेश मढवी यांच्या नेतृत्वाखालील स्पोर्टिंग कार्यशील पॅनलमधून सुषमा माधवीसह विद्यमान सचिव दिलीप धुमाळ, खजिनदार योगेश महाजन, सहसचिव सुशील म्हापुस्कर, ज्येष्ठ सदस्य किशोर ओवळेकर, सचिन गोरीवले, संदीप पाचंगे आणि माजी उपाध्यक्ष अतुल फणसे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दुसऱ्या बाजूला विलास जोशी आणि कैलास देवल यांच्यात नेतृत्वात स्पोर्टिंग क्लब पॅनलकडून विकास रेपाळे, श्रावण तावडे, मनोज यादव, प्रफुल्ल वैद्य, किरण साळगावकर, जितेंद्र मेहता आणि सतीश नाचणे यांनी आव्हान उभे केले आहे.
चुरशीची लढत होणार
या निवडणुकीत पहिल्यांदाच भाजपा, मनसे आणि उद्धवसेना एकत्र येऊन शिंदेसेनेला थेट आव्हान देत असल्याने या निवडणुकीकडे ठाण्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दोन्ही पॅनलमधील मुकाबला चुरशीचा ठरणार असून क्लबच्या सभागृहात महापौरांच्या निवडणुकीसारखीच हवा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राजेश मढवी हे भाजपाचे ठाणे उपाध्यक्ष आहेत, तर उद्ववसेनेचे विभागप्रमुख सचिन गोरीवले आणि मनसेच्या विद्यार्थी संघटनेचे संदीप पाचंगे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्यासमोर शिंदसेनेचे माजी नगरसेवक विकास रेपाळे यांच्या नेतृत्वातील पॅनल आहे.
दरम्यान, रिटर्निंग ऑफिसर म्हणून कमलाकर मराठे तर सहाय्यक अधिकारी म्हणून उमेश ग्रोव्हर आणि प्रल्हाद नाखवा हे काम पाहणार आहेत. सायंकाळी ५ ते ८ वाजेपर्यंत मतदान होईल.