भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ; शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 21:44 IST2025-11-13T21:43:54+5:302025-11-13T21:44:17+5:30
मीरा भाईंदर भाजपाला बळ देण्यासाठी मंत्री नाईक यांना मैदानात उतरवण्यात आले असून शनिवारी मीरारोड येथे नाईक यांचा वनमंत्री झाल्या नंतरचा पहिल्यांदाच जनता दरबार होत आहे.

भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ; शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात
वनमंत्री गणेश नाईक हे ठाणे जिल्ह्याचे भाजपाचे संपर्कमंत्री असले तरी मीरा भाईंदर मध्ये मात्र ते जनता दरबार घेत नव्हते. मात्र महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिंदेसेनेचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना शह देण्यासह मीरा भाईंदर भाजपाला बळ देण्यासाठी मंत्री नाईक यांना मैदानात उतरवण्यात आले असून शनिवारी मीरारोड येथे नाईक यांचा वनमंत्री झाल्या नंतरचा पहिल्यांदाच जनता दरबार होत आहे. भाजपाने नाईक यांच्या दरबार माध्यमातून शक्ती प्रदर्शनाची तयारी चालवली आहे. पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये मंत्री असताना नाईक यांचा मीरा भाईंदर महापालिकेत जनता दरबार होत असे.
मीरा भाईंदर हा भाजपाचा बालेकिल्ला बनला आहे. येथील उत्तरभारतीय, राजस्थानी, गुजराती वर्ग प्रामुख्याने भाजपाचा हक्काचा मतदार असल्याचे मानले जाते. त्यातूनच विविध आराखडे आखून २०१७ सालच्या निवडणुकीत पॅनल पद्धतीचा भाजपाला मोठा फायदा झाला व ६१ नगरसेवक निवडून आले होते. पालिकेत एकहाती सत्ता व देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी शिवसेना आणि सरनाईक यांची कोंडी केली होती.
त्यामुळे यंदा पण भाजपाला मीरा भाईंदर मध्ये एकहाती सत्ता राखायची आहे. मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून शिवसेनेची सत्ता आणण्यासाठी शिंदेसेनेचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकार काळात आणि नंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्या नंतर सरनाईक यांनी मीरा भाईंदर शहरासाठी शासना कडून निधी व कामे मंजूर करून घेतली आहेत. अनेक कामांची लोकार्पण केली आहेत.
मंत्री झाल्या नंतर सरनाईक यांनी शहरातील ताकद वाढवण्यावर भर दिला असून भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांना सरनाईक यांच्याशी एकहाती संघर्ष करणे सोपे राहिलेले नाही. शिवाय शिंदे आता उपमुख्यमंत्री असले तरी महत्वाचे नगरविकास खाते त्यांच्या कडे आहे. त्यातूनच सरनाईक व मेहता यांच्यात एकमेकां वर गंभीर स्वरूपांच्या आरोपां पासून टीका, तक्रारी सुरु आहेत.
वनमंत्री आणि ठाण्याचे संपर्कमंत्री झाल्या नंतर गणेश नाईक यांनी ठाणे, नवी मुंबई मध्ये अनेक जनता दरबार घेतले. मात्र मीरा भाईंदर मध्ये त्यांनी जनता दरबार घेतला नव्हता. मात्र येणाऱ्या महापालिका निवडणुकीत मंत्री सरनाईकांना रोखण्यासह भाजपाचा हा गड एकहाती टिकवून ठेवण्यासाठी केवळ नरेंद्र मेहतांवर भिस्त ठेऊन चालणार नसल्याने आता नाईक यांना मीरा भाईंदरच्या आखाड्यात उतरवण्यात आले आहे.
शनिवारी १५ नोव्हेम्बर रोजी सकाळी १० ते ४ वाजे पर्यंत मीरारोडच्या आप्पासाहेब धर्माधिकारी सभागृहात मंत्री नाईक यांचा जनता दरबार आयोजित केला गेला आहे. त्याची मेहता व भाजपाने जोरदार प्रसिद्धी चालवली आहे. मंत्री नाईक यांना जनता दरबारच्या माध्यमातून मीरा भाईंदर मध्ये पुन्हा सक्रिय केले जाणार आहे. बेलापूर विधानसभा मतदारसंघ हा पूर्वी मीरा भाईंदर पर्यंत असताना नाईक यांनी अनेक वर्ष आमदार तसेच मंत्री व पालकमंत्री म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. नाईक यांना मानणारा वर्ग आणि कार्यकर्ते पूर्वी बऱ्या पैकी होते. मात्र २००९ साली मीरा भाईंदर विधानसभा झाल्या नंतर नाईकांचा संपर्क कमी झाला शिवाय त्यांचे समर्थक देखील विविध पक्षात गेले. भाईंदर पालिकेतील नाईक यांच्या जनता दरबार विरुद्ध २००८ साली सध्या भाजपात असलेल्या एक माजी नगरसेविका यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.
परंतु मंत्री नाईक यांच्या शनिवारच्या जनता दरबार मुळे मीरा भाईंदर भाजपा मध्ये उत्साह निर्माण झाला आहे. कारण नाईक यांच्या सक्रियते मुळे भाजपाला आणखी बळ मिळेलच पण शिंदेसेनेचे मंत्री सरनाईक यांना रोखण्यात देखील ते उपयुक्त ठरतील अशी अपेक्षा भाजपातील काही जाणत्या कार्यकर्त्यांना वाटत आहे.