कल्याण : पश्चिमेकडील बिर्ला महाविद्यालय रोडवरील जे.आर. जिमचे टाळे तोडून बेकायदा आत प्रवेश करून सामान चोरून नेल्याच्या आरोपाखाली भाजपाचे नगरसेवक सचिन खेमा, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष सुधीर वंडार पाटील यांच्यासह ३७ जणांवर महात्मा फुले पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. जिमचे मालक व बांधकाम व्यावसायिक जगदीश सिंग यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.जिमच्या मालकीहक्कावरून जगदीश आणि त्यांच्या भावाची सून मंजिरी राजेश सिंग यांच्यात वाद असल्याची माहिती मिळत आहे. यातूनच हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी मंजिरी यांच्यावरही दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. तिच्यासह सचिन खेमा, सुधीर पाटील आणि अन्य ३७ जणांनी जिममध्ये बेकायदा घुसून संगणक, स्पीकर, इंटरनेट राउटर, फालकन कंपनीच्या सप्लिमेंटचे दोन डबे आणि जिमची कागदपत्रे असा सात हजारांचा मुद्देमाल चोरी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
भाजपा नगरसेवकावर दरोड्याचा गुन्हा, जिममधील सामान चोरले : राष्ट्रवादीच्या पदाधिका-याचाही समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 02:10 IST