शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंमुळे भाजपाला सत्ता मिळाली: मुझफ्फर हुसैन
By धीरज परब | Updated: November 23, 2025 17:35 IST2025-11-23T17:32:32+5:302025-11-23T17:35:32+5:30
बाळासाहेबांच्या शिवसेनेला संपवण्याचे व बदनाम करण्याचे कारस्थान जनता सहन करणार नाही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुझफ्फर हुसैन यांनी सांगितले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंमुळे भाजपाला सत्ता मिळाली: मुझफ्फर हुसैन
लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी खऱ्या अर्थाने मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी लढा देत हिंदुत्वाचा गजर करीत देशाला एक दिशा दिली. भाजपची राज्यात व देशात ताकदच नव्हती. केवळ बाळासाहेबां मुळे भाजपाला सत्ता मिळाली आणि त्याच भाजपाने बाळासाहेबांच्या शिवसेनेला संपवण्याचे व बदनाम करण्याचे कारस्थान जनता सहन करणार नाही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुझफ्फर हुसैन यांनी सांगितले.
भाईंदर पूर्वेच्या बाळासाहेब ठाकरे कलादालनास मुझफ्फर हुसेन सह काँग्रेसच्या आफरीन हुसेन, प्रकाश नागणे, जय ठाकूर, राकेश राजपुरोहित, ठाकरे सेनेचे आराध्य सामंत व काँग्रेस कार्यकर्त्यांनी भेट दिली. " बाळ ते बाळासाहेब " हा त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास, बाळासाहेब यांची निवडक भाषणं, मातोश्रीतील त्यांची खोली, प्रिंटिंग प्रेस, खांडके बिल्डिंग चाळ देखावा हुबेहूब साकारला आहे. १९६६ सालची शिवसेना शाखा यासह लहान मुलांसाठी गेम झोन, सायन्स सेंटर, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र विभाग, एमपीएससी व यूपीएससी विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका व ग्रंथालय तसेच मिनी थिएटर या सर्व सुविधा या कलादालनाच्या माध्यमातून मिरा भाईंदर च्या नागरिकांना पाहता येतील.
बाळासाहेब नसते तर भारतीय जनता पक्ष सत्तेमध्ये आलाच नसता, कारण राज्यात आणि देशात भाजप ची ताकद नव्हती त्यावेळी शिवसेनेच्या मदतीने राज्यातील राजकारणात पाय रोवले हे नाकारता येणार नाही. एक नेता, एक विचार व एक दिशा दाखवत त्यांनी राजकारणात वेगळा ठसा उमटवला आहे. वाचन, लेखन, पत्रकारिता, क्रिकेट, नाट्य, सिनेमा आदीं ची आवड होती. कार्टूनिष्ट म्हणून त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण केली. त्यांनी कधी जातीवाद, धर्मवाद केला नाही. शहरात सर्व जाती, धर्म, पंथ, प्रांत चे लोक राहतात, त्यांना बाळासाहेब यांचे कार्य, महती समजेल असे मुझफ्फर म्हणाले.
बाळासाहेबांचे कलादालन होऊ नये म्हणून मीरा भाईंदर महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने अनेक प्रयत्न केले. त्यावेळी बाळासाहेबांचे कलादालन व्हावे म्हणून काँग्रेसच्या नगरसेवकांनी नेहमी शिवसेना नगरसेवकांना साथ दिली. सत्तेच्या पाशवी बळावर भाजपाने बाळासाहेबांचे कलादालनची अडवणूक केली मात्र मंत्री प्रताप सरनाईक यांनी पाठपुरावा करून हि एक ऐतिहासिक संकल्पना साकारली ह्या बद्दल त्यांचे विशेष कौतुक असल्याचे मुझफ्फर म्हणाले.
या कलादालनात १९७९ मध्ये मीरारोडच्या नयानगरची पायाभरणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि मुस्लिम लीगचे खासदार गुलाम महेमूद बनातवाला यांच्या हस्ते झाली होती. त्यांना आपले वडील कै. सैयद नज़र हुसैन यांनी निमंत्रित केले होते. ते ऐतिहासिक छायाचित्र कलादालनात असल्याचा आनंद आहे. बाळासाहेबांनी देशद्रोही यांचा कडवट विरोध केला होता. त्यांनी कधी सरसकट मुस्लिम समाजाचा द्वेष केला नव्हता. शिवसेनेत त्यांच्या सोबत अनेक मुस्लिम नेते होते. मुस्लीम बहुल नया नगर व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब यांचे भावनिक नाते जोडले आहे असे सांगताना ते भावुक झाले. शहरातील जनतेने व राजकीय पक्षातील नेत्यांनी राजकारण बाजूला ठेऊन या कलादालनास भेट द्यावी असे आवाहन त्यांनी केले.