मीरा भाईंदरमध्ये शिंदेसेनेच्या कंटेनर शाखांविरोधात भाजपा आक्रमक; शिंदेसेनेच्या कंटेनर शाखेप्रमाणेच भाजपाची कंटेनर कार्यालये थाटणार
By धीरज परब | Updated: May 9, 2025 22:20 IST2025-05-09T22:19:39+5:302025-05-09T22:20:22+5:30
Mira Bhayandar News: शिवसेना शिंदे गटाच्या वतीने शहरात रस्ते, पदपथ वर २०२३ सालात कंटेनर शाखांची उदघाटने केल्यावरून त्यावेळी राजकीय विरोध झाला होता. आता पुन्हा शहरात शिंदेसेनेने नव्याने कंटेनर शाखा रस्ते-पदपथ वर ठेवल्याने भाजपाने विरोध करत आता भाजपाची कंटेनर कार्यालये थाटण्याची तयारी सुरु केली आहे.

मीरा भाईंदरमध्ये शिंदेसेनेच्या कंटेनर शाखांविरोधात भाजपा आक्रमक; शिंदेसेनेच्या कंटेनर शाखेप्रमाणेच भाजपाची कंटेनर कार्यालये थाटणार
मीरारोड - शिवसेना शिंदे गटाच्या वतीने शहरात रस्ते, पदपथ वर २०२३ सालात कंटेनर शाखांची उदघाटने केल्यावरून त्यावेळी राजकीय विरोध झाला होता. आता पुन्हा शहरात शिंदेसेनेने नव्याने कंटेनर शाखा रस्ते-पदपथ वर ठेवल्याने भाजपाने विरोध करत आता भाजपाची कंटेनर कार्यालये थाटण्याची तयारी सुरु केली आहे. भाजपा आमदार नरेंद्र मेहतांनी देखील कंटेनर वरून टोलेबाजी केली आहे.
२०२३ मध्ये शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी सुरवातीला ६ कंटेनर शाखांची उदघाटने केली होती. त्या नंतर आणखी काही कंटेनर शाखा थाटल्या. भाजपा सह शिवसेना ठाकरे गट, मनसे, काँग्रेस आदींनी सदर बेकायदा कंटेनर वर कारवाई करण्याची मागणी केल्या नंतर काही कंटेनर शाखा उचलल्या गेल्या. मात्र शिंदेसेनेने ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बेकायदा कार्यालये व बांधकामे याच्या तक्रारी केल्या. कालांतराने राजकीय विरोध थंडावला आणि कंटेनर शाखा अनेक ठिकाणी सुरु झाल्या.
दरम्यान, काही दिवसां पूर्वी भाईंदर पश्चिमेस शिवसेना गल्ली नाका येथे पदपथावर कंटेनर शाखा शिंदेसेनेने ठेवली. त्याला भाजपाने विरोध करत अधिकाऱ्यांना तक्रारी केल्या. क्रेनच्या सहाय्याने पालिका पथकाने कंटेनर शाखा उचलून नेली. मात्र काही वेळाने पालिकेनेच कंटेनर पुन्हा आणून फुटपाथ वर ठेवला. भाजपाचे राजेंद्र सिंह यांनी ठरत आयुक्त राधाबिनोद शर्मा यांना भेटून शिंदेसेनेच्या अनधिकृत कंटेनर शाखे बद्दल तक्रार केली. कंटेनरना परवानगी आहे का? आम्ही सुद्धा कंटेनर ठेऊ इच्छितो असे पत्र दिले. तसेच पालिकेने कारवाई केली नाही तर अन्य लोकांना सुद्धा कंटेनर ठेवण्यास सूट देण्याची मागणी केली.
इतकेच नाही तर सिंह यांनी महापालिका आयुक्त यांच्या कनकिया येथील पालिका निवासस्थान समोरील पदपथावर भाजपाचे कंटेनर कार्यालयचे उदघाटन भाजपा आमदार नरेंद्र मेहता आणि जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा यांच्या हस्ते करण्या बाबतची निमंत्रण पत्रिकाच जाहीर केली आहे. आ. मेहता यांनी देखील, शहर एकदम लवारीस असून आयुक्त मोठ्या मनाचे असून दुकान विकत घेण्याची गरज नाही. शहरात कुठेही फुटपाथवर इस्टेट एजंट, दुकानवाले, कपडेवाले, राजकारणी, कार्यालये कंटेनर ठेऊन धंदा करू शकतात. सर्वाना सूट आहे. कुठेही कंटेनर लावा असा टोला लगावला आहे.