बिश्नोई गॅगला १.२७ कोटींची खंडणी दिल्याचा बनाव, मित्रानेच केली मित्राची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 18:29 IST2025-08-28T18:29:39+5:302025-08-28T18:29:59+5:30
कापूरबावडी पाेलीस ठाण्यात गुन्हा: कर्जातून वाचण्यासाठी मित्रासह त्याच्या परिवारालाच ठार मारण्याचीही धमकी

बिश्नोई गॅगला १.२७ कोटींची खंडणी दिल्याचा बनाव, मित्रानेच केली मित्राची फसवणूक
ठाणे: ठाण्यातील व्यावसायिक अभिनव गर्जे यांच्याकडून अंधेरीतील त्यांचा मित्र दीपक मलिक याने विश्वास संपादन करुन एक काेटी २७ लाखांचे कर्ज घेतले हाेते. कर्जाची ही रक्कम परत न करता, त्याच रक्कमेची खंडणी बिश्नोई गॅंगला दिल्याचा बनाव करीत मलिक याने फसवणूक केल्याचा वेगळाच प्रकार दाखल झाल्याची माहिती कापूरबावडी पाेलिसांनी गुरुवारी दिली. याप्रकरणी चाैकशी करण्यात येत असून फसवणूक करणाऱ्या या ठकसेनाचा शाेध घेण्यात येत असल्याचेही पाेलिसांनी सांगितले.
हा प्रकार जून २०२३ ते २७ मार्च २०२५ दरम्यान घडल्याचे गर्जे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. मलिक याने गर्जे यांना विश्वासात घेत त्यांच्या कंपनीबाबतचा आर्थिक तपशील घेतला. त्यानंतर गर्जे यांच्याकडे कर्जाची मागणी केली. सुरुवातीला गर्जे यांनी नकार दिल्यावर मलिक याने त्याबाबत वारंवार नाराजी व्यक्त केली. त्यानुसार २५ ऑक्टोबर २०२३ रोजी दर तीन महिन्याला वीस टक्के रक्कम परत करताे, असेही मलिक याने गर्जे यांना सांगितल्यावर गर्जे यांनी एक काेटी २७ लाख रुपये कर्ज म्हणून मलिकला दिले. दरम्यान तीन महिन्यानंतर गर्जे यांनी मलिक याच्याकडे पैशांची मागणी केली. तेंव्हा ही रक्कम त्याने परत केलीच नाही.
यादरम्यान, मलिकने गर्जे यांच्या व्हाट्सअप क्रमांकावर कॉल करून आपण लॉरेन्स बिश्नोई बोलत असल्याची बतावणी करीत गर्जे यांच्याकडे ५० कोटींच्या खंडणीची मागणी केली. खंडणीची ही न दिल्यास गर्जे यांच्यासह त्यांच्या परिवाराला ठार ठार मारण्याची धमकी दिली. खंडणीचा प्रकार मिटविण्यासाठी मलिक हा गर्जेला दिल्लीला घेऊन गेला.
त्याठिकाणाहून ४० कोटी रुपयांमध्ये खंडणीसाठी तडजोड केल्याचे भासविले. गर्जे यांच्याकडून त्याने अाधी घेतलेली एक काेटी २७ लाखांच्या कर्जाची रक्कमही बिश्नोई गॅंगला खंडणी म्हणून दिल्याचा बनाव केला. या फसवणूकीप्रकरणी मलिक याच्याविरुद्ध कापूरबावडी पोलिस ठाण्यात २७ ऑगस्ट २०२५ राेजी गुन्हा दाखल झाला. वरीष्ठ पोलिस निरीक्षक प्रविण माने हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.