भाईंदरमध्ये इमारतीचा सज्जा पडून एक जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 21:09 IST2021-08-15T21:08:59+5:302021-08-15T21:09:50+5:30
आनंदनगर ए ही इमारत जुनी असून आज रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास इमारतीच्या तळमजल्यावरील दुकानांचा सज्जा खाली कोसळला.

भाईंदरमध्ये इमारतीचा सज्जा पडून एक जण जखमी
मीरा रोड - भाईंदर पूर्वेच्या विमल डेरी मार्गावरील आनंद नगर ए या इमारतीचा सज्जा कोसळून एक जण जखमी झाला आहे. महापालिकेने सदर इमारत रिकामी करण्यास घेतली असून रहिवाशांना क्रीडा संकुलासमोरील सदनिकांमध्ये तात्पुरते स्थलांतरित केले आहे.
आनंदनगर ए ही इमारत जुनी असून आज रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास इमारतीच्या तळमजल्यावरील दुकानांचा सज्जा खाली कोसळला. यावेळी खाली असलेल्या मनोहर काशीलाल जैन (५५) जखमी झाले. त्यांना नजीकच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर घटनेची माहिती मिळताच आमदार गीता जैन, विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील, स्थानिक नगरसेविका तारा घरत, स्नेहा पांडे, अग्निशमन दलाचे प्रमुख प्रकाश बोराडे यांच्यासह पूजा आमगावकर, पवन घरत आदींनी घटनास्थळी पाहणी केली. इमारत जुनी असल्याने पुन्हा कोणती दुर्घटना होऊन जीवित हानी होऊ नये या करता अग्निशमन दलाच्या जवानांनी सदर इमारत रिकामी करायला घेतली.
दरम्यान महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांची भेट घेऊन शिवसेना नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी रहिवाशांचे पुनर्वसन पर्यायी जागेत करण्याची मागणी केली. पालिका क्रीडा संकुला समोरील एमएमआरडीएच्या भाडेतत्त्वावरील सदनिका महिन्याभरासाठी राहिवाश्याना राहण्यास उपलब्ध करून देण्यात आल्याचे प्रवीण पाटील म्हणाले.