ठाण्यात लागले ‘एकनिष्ठेच्या फळा’चे बॅनर; शरद पवार यांचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 06:35 IST2019-12-30T04:42:11+5:302019-12-30T06:35:53+5:30
जितेंद्र आव्हाड यांचा मंत्रिमंडळ प्रवेश निश्चित असल्याची चर्चा

ठाण्यात लागले ‘एकनिष्ठेच्या फळा’चे बॅनर; शरद पवार यांचे फोटो
ठाणे : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार सोमवारी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यात लावलेल्या ‘एकनिष्ठेचे फळ’ या फलकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या बॅनरवर महापुरुषांच्या फोटोंबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार तसेच आ. जितेंद्र आव्हाड यांच्या आईवडिलांचे फोटो झळकताना दिसत आहेत. त्यामुळे आव्हाड यांचा मंत्रिमंडळातील समावेश पक्का असल्याची चर्चा ठाण्यात रंगली आहे.
आव्हाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात तेच राष्ट्रवादी काँग्रेसचा चेहरा होते. गणेश नाईक यांच्यासारखे काही सहकारी शरद पवार यांची साथ सोडून गेले, तेव्हा काहीही झाले तरी मी माझ्या साहेबांसोबत राहणार, अशी ग्वाही त्यांनी वेळोवेळी आपल्या भाषणात दिली होती. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करताना आमदारांची पंचतारांकित हॉटेलांमध्ये व्यवस्था केली होती. त्या आमदारांचे संरक्षण करण्याची जबाबदारी आव्हाड यांनी पार पाडली होती. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अजित पवार यांनी शपथ घेतली, तेव्हा पवार कुटुंबातील वादळात आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याची नि:संदिग्ध ग्वाही आव्हाड यांनी दिली होती.
राजकारणात आपल्याला शरद पवार यांनी संधी दिली व त्यांच्या प्रत्येक आदेशाचे आपण पालन करणार, असे ते सतत सांगत असतात.
आव्हाड यांच्या मंत्रिमंडळातील समावेशामुळे एकनिष्ठ राहिलेल्यांना त्याचे फळ मिळते, असा संदेश राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे. येत्या काही महिन्यांत ठाणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असून आव्हाड यांच्या मंत्रिमंडळ समावेशामुळे राष्ट्रवादीची बांधणी करून काही नेत्यांच्या पक्ष सोडण्यामुळे पक्षाचे झालेले नुकसान भरून काढण्याकरिता त्यांना बळ मिळेल, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.