ठाणे - दिल्लीतील मोहल्ला क्लिनीकच्या धर्तीवर ठाणे महापालिका हद्दीत आपला दवाखाना सुरु करण्यात आला होता. यासाठी तब्बल १६० कोटींचा खर्च पालिकेच्या तिजोरीतून केला जाणार आहे. त्यानुसार दोन वर्षापूर्वी पाच आणि त्यानंतर २० दवाखाने सुरु करण्यात आले. त्यानुसार आतापर्यंत येथे तब्बल ७० हजार रुग्णांनी मोफत उपचार घेतले आहेत. परंतु आता प्रशासकीय घोळामुळे या महत्वांकाक्षी प्रकल्पाला अखेर शुक्रवारी टाळे लावण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे यात सत्ताधारी शिवसेनेचे देखील अपयश दिसून आले आहे. ही योजना सुरु करतांना जॉन्ईट व्हॅन्चरमध्ये सुरु करण्यात आली होती. त्यानुसार या कंपनीच्या माध्यमातून हे काम सुरु होणो अपेक्षित होते. परंतु महापालिकेच्या प्रशासकीय घोळामुळे या कामाचे कार्याध्येश जी कंपनी निविदा प्रक्रियेत सहभागीच झाली नव्हती. त्या कंपनीला देण्यात आले होते. त्यामुळे बीलाचा देखील घोळ झाला असून त्यामुळेच या दवाखान्यांना अखेर टाळे लावले गेले आहे.दिल्लीत आप या पक्षाच्या वतीने मोहल्ला क्लिनीक ही संकल्पना राबविली आहे. त्याच धर्तीवर ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरात आपला दवाखाना ही संकल्पना राबविण्याचा निर्णय दोन वर्षापूर्वी घेण्यात आला. परंतु या योजनेला विरोधकांनी जोरदार विरोध केला होता. असे असतांनाही शिवसेनेही ही योजना एकहाती मंजुरी करुन घेतली होती. त्यानुसार पुढील पाच वर्षासाठी पालिका १६० कोटींचा खर्च केला जाणार आहे. शहराच्या विविध भागात एकूण ५० आपला दवाखाना (ई हेल्थ स्मार्ट क्लिनिक) सुरू करण्यात येणार आहेत. ठाणे महानगर पालिकेने मेडीकल ऑन गो प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून ठाणो शहरामध्ये ‘आपला दवाखाना (ई हेल्थ स्मार्ट क्लिनिक) ही संकल्पना निश्चित केले. परंतु ठाणो पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि शासनाच्या सिव्हील रुग्णालयामध्ये ज्या सुविधा मोफत मिळत आहेत. त्या सुविधांसाठीही या ‘आपला दवाखाना’मध्ये १० रु पये दर आकारला जाणार होते. ‘आपला दवाखाना’ मुळे ठाणे महानगर पालिकेला पाच वर्षांसाठी १४४ कोटी आणि भांडवली खर्चापोटी १५.६० कोटी असे सुमारे १५९.६० कोटी खाजगी संस्थेला द्यावे लागणार होते. त्यामुळेच विरोध वाढला होता.
सध्याच्या परिस्थितीत आरोग्य सेवेला खुप महत्व आहे. त्यामुळे प्रशासनाने संबधींत कंपनीचे बील अदा करणे अपेक्षित आहे. तसेच संबंधीत दोन कंपनीमध्ये देखील काही मुद्यावरुन विरोधा भास दिसून आलेला आहे. परंतु यावर लवकरच तोडगा काढून पुन्हा आपला दवाखाना सुरु केला जाईल.(नरेश म्हस्के - महापौर, ठामपा)