आरोपींना शोधायला गेलेल्या पोलिसांवर हल्ला, भिवंडीतील प्रकार : पोलिस जखमी, गाडीचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 05:40 IST2025-02-19T05:38:32+5:302025-02-19T05:40:53+5:30
शहरातील वऱ्हाळ, देवीनगर, कामतघर या झोपडपट्टी परिसरात शेजाऱ्यांमध्ये मुलांचे प्रेमप्रकरण असल्याच्या संशयातून झालेल्या भांडणात आई-वडील व अल्पवयीन मुलीस मारहाण केली. यावेळी घाबरून अल्पवयीन मुलीने फिनेल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

आरोपींना शोधायला गेलेल्या पोलिसांवर हल्ला, भिवंडीतील प्रकार : पोलिस जखमी, गाडीचे नुकसान
भिवंडी : अल्पवयीन मुलीसह तिच्या आई-वडिलांना मारहाण केलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर स्थानिक जमावाने केलेल्या दगडफेकीत एक पोलिस जखमी झाला असून पोलिस वाहनाची तोडफोड केल्याची घटना घडली. या प्रकरणी उमेश गायकवाड, सचिन साठे, कृष्ण मंडल, नवीन ऊर्फ चिंट्या, शुभम परुळेकर, उमा वाघमारे, पंकज कांबळे व इतर ३० ते ४० जणांविरोधात गुन्हा दाखल केला.
शहरातील वऱ्हाळ, देवीनगर, कामतघर या झोपडपट्टी परिसरात शेजाऱ्यांमध्ये मुलांचे प्रेमप्रकरण असल्याच्या संशयातून झालेल्या भांडणात आई-वडील व अल्पवयीन मुलीस मारहाण केली. यावेळी घाबरून अल्पवयीन मुलीने फिनेल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अल्पवयीन मुलीस उपचारासाठी आयजीएम रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती स्थानिक नारपोली पोलिस ठाण्यास मिळताच पोलिस आयजीएम रुग्णालयात दाखल होऊन अल्पवयीन मुलीचा जाबजबाब घेतला.
अरेरावीची भाषा वापरली
या गुन्ह्यातील आरोपी हे वऱ्हाळ देवीनगर झोपडपट्टी येथे असल्याची माहिती समजल्याने पोलिस उपनिरीक्षक आकाश पवार व सुनील शिंदे व तडवी हे पथक पोलिस जीप घेऊन घटनास्थळी आरोपींना पकडण्यासाठी गेले.
यावेळी तेथील काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी पोलिस पथकासोबत अरेरावीची भाषा वापरून त्यांना शिवीगाळ, धक्काबुक्की केली. पोलिसांनी त्यांना अडवण्याचा व आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला असता ३० ते ४० जणांच्या जमावाने पोलिसांवर व पोलिस वाहनावर दगडफेक करीत हल्ला चढविला.
यामध्ये पोलिस शिपाई तडवी यांना दगड लागल्याने ते जखमी झाले. जमावाने पोलिस जीपवर हल्ला चढवल्याने जीपचे नुकसान झाले. पोलिस शिपाई तडवी यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.