रेंटलमधील तब्बल ४० गाळे १४ वर्षापासून बंद स्थितीत

By अजित मांडके | Published: April 3, 2024 03:10 PM2024-04-03T15:10:49+5:302024-04-03T15:11:10+5:30

रस्ता रुंदीकरणात बाधीत, धोकादायक इमारती व इतर कारणांसाठी बाधीत झालेल्या रहिवाशांना महापालिकेच्या माध्यमातून रेंटलच्या इमारतीत ठेवण्यात येत आहे.

As many as 40 units in the rental have been closed for 14 years | रेंटलमधील तब्बल ४० गाळे १४ वर्षापासून बंद स्थितीत

रेंटलमधील तब्बल ४० गाळे १४ वर्षापासून बंद स्थितीत

ठाणे :  वर्तक नगर येथील दोस्ती रेंटलच्या ठिकाणी असलेले तब्बल ४० गाळे वितरीत करण्यात आले नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. मागील सुमारे १४ वर्षापासून हे गाळे बंद स्थितीत असून ते गाळे भाडेतत्वावर किंवा विकत दिले गेले असते तर किमान येथील स्वच्छता आणि इतर महत्वाच्या बाबी देखील सुरळीत झाल्या असत्या असा कयास आता लावला जात आहे.

रस्ता रुंदीकरणात बाधीत, धोकादायक इमारती व इतर कारणांसाठी बाधीत झालेल्या रहिवाशांना महापालिकेच्या माध्यमातून रेंटलच्या इमारतीत ठेवण्यात येत आहे. वर्तक नगर येथे दोस्तीची रेंटल होमची घरे आहेत. याठिकाणी ४ इमारती असून त्याठिकाणी १४४८ फ्लॅट आहेत. मागील कित्येक वर्षापासून येथे रहिवासी वास्तव्यास आहेत. तसेच याठिकाणी तब्बल ४० गाळे असून ते आजतागायत बंद स्थितीत असल्याची माहिती महापालिका सुत्रांनी दिली. वास्तविक पाहता एमएमआरडीएने हे गाळे भाड्याने किंवा विकत देणे अपेक्षित होते. परंतु अद्यापही ते गाळे कोणालाही वाटप करण्यात आलेले नाहीत.

या इमारतीमध्ये ठाण्यातील मुंब्रा, कळवा, वागळे, लोकमान्य नगर, घोडबंदर रोड आदींसह शहराच्या विविध भागातून विस्थापीत झालेले कुटुंबे मागील कित्येक वर्षापासून वास्तव्य करीत आहेत. परंतु त्यांना सुविधांची नेहमी वाणवा जाणवत आहे. लिफ्ट सतत नादुरुस्त असणे, पिण्याच्या पाण्याचा अभाव, स्वच्छतेचा अभाव, दरवाजे तुटलेल्या स्थितीत, सीसीटीव्ही देखील तोडून फोडून ठेवलेल्या स्थितीत दिसत आहेत. त्यामुळे येथे चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी येथील रहिवाशांनी वारंवार महापालिकेकडे पाठपुरावा केला आहे. तेवढ्यापुर्ती स्वच्छता किंवा इतर बाबींकडे लक्ष दिले जात आहे. मात्र पुन्हा ये रे माझ्या मागल्या प्रमाणे येथे सुविधांची वानवा दिसून आली आहे.

परंतु जर येथील गाळे भाड्याने किंवा विकत दिले गेले असते, तर किमान त्याचा चांगला परिणाम येथील स्वच्छतेवर दिसून आला असता, असे मत येथील रहिवाशांनी व्यक्त केले आहे. मागील १४ वर्षापासून येथील गाळे बंद स्थितीत आहेत. त्या गाळ्यांचे वाटप का झाले नाही? याचे उत्तर देखील महापालिकेकडे नाही. एमएमआरडीएच्या माध्यमातून या गाळ्यांचे वितरण होणे अपेक्षित असल्याचे मत पालिकेतील एका वरीष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केले आहे.

Web Title: As many as 40 units in the rental have been closed for 14 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे