ठाण्यात संचारबंदी काळात अफवा पसरविणाऱ्याविरुद्ध कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 00:28 IST2020-03-25T00:20:40+5:302020-03-25T00:28:11+5:30
मनाई आदेशाचा भंग करीत दुकाने सुरु असल्याची अफवा पसरविणा-या श्रेयस गवस याच्याविरुद्ध कासारवडवली पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल केला आहे.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई आदेश लागू केला आहे. याच मनाई आदेशाचा भंग करीत दुकाने सुरु असल्याची अफवा पसरविणा-या श्रेयस गवस याच्याविरुद्ध कासारवडवली पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याविरुद्ध राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नुसार कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गवस याने त्याच्या मोबाईलवरुन ठाणे शहर पोलीस नियंत्रण कक्ष तसेच कासारवडवली पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक शशिकांत भदाणे यांना दुकाने सुरु असल्याची खोटी माहिती खोडासळपणसे वारंवार दिली. तसेच घटनास्थळी खूप व्यक्ती काम करीत असून मोठया प्रमाणात गर्दी झाल्याचीही अफवा पसरविली. अशा प्रकारे खोटी माहिती देणे आणि अफवा पसरविणे हे गुन्हेगारी कृत्य असून ते न करण्याबाद्दलही पोलीस नाईक भदाणे यांनी त्याला बजावले. तरीही त्याने २३ मार्च रोजी सायंकाळी ७.२० वाजण्याच्या सुमारास घोडबंदर रोडवरील साईनगर येथील जी कॉर्प संकूल येथून त्याने पोलीस नियंत्रण कक्षाकडे तसेच इतरत्र खोटी माहिती देत अफवा पसरविली. अखेर याप्रकरणी त्याच्याविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी सांगितले.