संपूर्ण राज्यभर आंदोलन पेटवणार - आनंद परांजपे  

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 05:53 PM2020-01-03T17:53:06+5:302020-01-03T17:53:19+5:30

दरवर्षी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावर दिमाखदार सोहळा पार पडतो.

Anand Paranjpe protest against bjp on No Maharashtra tableau at this year's R-Day parade | संपूर्ण राज्यभर आंदोलन पेटवणार - आनंद परांजपे  

संपूर्ण राज्यभर आंदोलन पेटवणार - आनंद परांजपे  

Next

ठाणे - प्रजासत्ताक दिनी दरवर्षी महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी होत असतो. मात्र, सत्तांतर झाल्याने केंद्रातील मोदी-शहा सरकारने यंदा महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारली आहे, असा आरोप करीत कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली तसेच विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी, प्रदेश चिटणीस तथा ज्येष्ठ नगरसेवक सुहास देसाई, महिलाध्यक्षा सुजाता घाग, ज्येष्ठ नगरसेवक मुकुंद केणी यांच्या उपस्थितीत केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.

दरवर्षी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावर दिमाखदार सोहळा पार पडतो. या सोहळ्यामध्ये भारताची संरक्षण दले शस्त्रास्त्रांसह शक्तिप्रदर्शन करतात. तसेच विविध राज्यांचे चित्ररथ संचलनामध्ये सहभाग घेत आपापल्या राज्याच्या सांस्कृतिक वैशिष्ट्यांचे प्रदर्शन घडवत असतात. मात्र यावर्षी चित्ररथाचा प्रस्ताव नाकारला गेल्याने प्रजासत्ताक दिनातील संचलनात महाराष्ट्र दिसणार नाही. केंद्र सरकारच्या या भूमिकेचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला. “ एक दो, एक दो... मोदी सरकार को फेक दो; महाराष्ट्र मे हम एक है, मोदी- शहा फेक है; मोदी-शहा मुर्दाबाद आदी घोषणा देत कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. विशेष म्हणजे, मागील वर्षीच्या चित्ररथात सहभागी झालेला कलावंत गणेश सुखदेवे याला या निदर्शनांची माहिती मिळताच तो देखील उत्स्फूर्तपणे यामध्ये सहभागी झाला होता.

यावेळी आनंद परांजपे यांनी सांगितले की, महाराष्ट्र ही वीरांची भूमी आहे. शिव-शाहू-फुले- आंबेडकरांसह अनेक महापुरुषांचा वारसा सांगणारी ही भूमी आहे. या भूमीवर अन्याय करण्याचा प्रयत्न मोदी-शहा यांनी केला आहे. देशाचे नेते शरद पवार यांनी दिल्लीच्या तख्तासमोर मान न झुकता आपला बाणेदारपणा दिल्लीकरांना दाखवून दिला आहे. दिल्लीचया तख्तापुढे महाराष्ट्र झुकत नाही, ही शिवरायांपासूनची परंपरा शरद पवार यांनी कायम राखली असल्यामुळेच दिल्लीच्या सत्तेत बसलेल्या मोदी-शहा यांनी जाणीवपूर्वक याच वर्षी महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारुन आपला महाराष्ट्रद्वेष दाखविला आहे.

आम्ही हा अवमान सहन करणार नाही. ठाण्यातून याची सुरुवात झाली असून सबंध महाराष्ट्रभर हे आंदोलन पेटणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला. तर, मागील वर्षीच्या चित्ररथात सहभागी झालेला कलावंत गणेश सुखदेवे याने, दरवर्षीच्या चित्ररथांमध्ये महाराष्ट्र बाजी मारत असतो. यंदा मराठी माणसाच्या अस्मितेला धक्का लावण्याचा झालेला प्रयत्न दुर्दैवी असल्याचे सांगितले.

Web Title: Anand Paranjpe protest against bjp on No Maharashtra tableau at this year's R-Day parade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे