मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 10:16 IST2025-12-20T10:16:11+5:302025-12-20T10:16:33+5:30
राज्यातील २३ नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी आज मतदान होत आहे. त्यात ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगरपरिषदेच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपा-शिंदेसेना आमनेसामने आल्या आहेत

मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
अंबरनाथ - शहरातील नगरपरिषदेसाठी आज मतदान पार पडत आहे. परंतु मतदानाच्या आदल्यारात्री भाजपा कार्यकर्ते मतदारांना पैसे वाटप करत असल्याचा आरोप झाला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी पैसे वाटणाऱ्यांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडे भाजपा उमेदवाराच्या पावतीसह नोटांची बंडले सापडली. पूनम पाटील असं भाजपा उमेदवाराचे नाव या पावतीवर होते. त्यानंतर निवडणूक आयोगच्या अधिकाऱ्यांनी भाजपाच्या २ कार्यकर्त्यांना याबाबत विचारणा केली. तेव्हा या दोघांकडून इमारतीतील लोकांची नावे आणि पैसे सापडले.
राज्यातील २३ नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी आज मतदान होत आहे. त्यात ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगरपरिषदेच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपा-शिंदेसेना आमनेसामने आल्या आहेत. याठिकाणी मतदानाच्या आदल्यारात्री भाजपा कार्यकर्त्यांना पैसे वाटप करताना अजित पवारांच्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी पकडले. प्रभाग क्रमांक २८ मध्ये २ जणांना पैशाच्या पाकिटांसह पकडले. राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनंतर निवडणूक आयोगाचे भरारी पथक तिथे पोहचले. त्यानंतर पकडण्यात आलेल्या दोघांकडून पैसे, भाजपा उमेदवाराची पावती जप्त करण्यात आली.
शिंदेसेनेवर बोगस मतदार आणल्याचा आरोप
त्यानंतर कोहोजगाव परिसरात शेकडो महिला एका सभागृहात जमल्या होत्या. या महिला बोगस मतदार असल्याचा संशय असल्याने भाजपा आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी घटनास्थळी पोहचत शिंदेसेनेवर आरोप केले. महिला बोगस मतदान करण्यासाठी आणल्याचा आरोप काँग्रेसने केला. सध्या या महिला कुठून आणि कशासाठी आल्या होत्या याबाबत चौकशी केली जात आहे.
EVM मध्ये छेडछाड केल्याचा दावा
दरम्यान, नगर परिषदेच्या मतदानासाठी प्रशासनाची जोरदारी तयारी सुरू होती. त्यात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून अंबरनाथ येथे ईव्हीएममध्ये छेडछाड होत असल्याचा आरोप करण्यात आल्याने खळबळ माजली. प्रभाग क्रमांक ५ च्या ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचा आरोप शिंदेसेनेने केला. अंबरनाथ येथील साऊथ इंडियन शाळेत उभारण्यात आलेल्या मतदान केंद्रावर हा प्रकार घडला. त्यानंतर मोठ्या संख्येने शिंदेसेनेचे कार्यकर्ते याठिकाणी जमले. भाजपा उमेदवाराचा भाऊ तुषार तेलंगे याच्यावर शिंदेसेनेचे उमेदवार शैलेश भोईर यांनी आरोप केला. त्यामुळे अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीनिमित्त सत्ताधारी महायुतीतील तिन्ही पक्षांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केल्याने मतदानावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.