ठाण्यातील गुंडावर एमपीडीए अंतर्गत तडीपारीची कारवाई
By जितेंद्र कालेकर | Updated: September 13, 2022 22:03 IST2022-09-13T22:02:21+5:302022-09-13T22:03:40+5:30
नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे.

ठाण्यातील गुंडावर एमपीडीए अंतर्गत तडीपारीची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कळव्यातील घोलाईनगर भागात हाणामाऱ्यांसह सरकारी कामात अडथळा निर्माण करून दहशत माजविणारा गुंड सुकेश उर्फ भोला अमोल झा (३०, रा. घोलाईनगर, कळवा) याच्यावर एमपीडीएअंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केल्याची माहिती कळवा पोलिसांनी मंगळवारी दिली. त्याची नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे.
सुकेश उर्फ भोला याच्याविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात गंभीर दुखापत करणे, ठार मारण्याची धमकी देणे, मारामारी, सरकारी कामात अडथळा निर्माण करून मारहाण करणे, महिलाविरुद्ध अत्याचार, अवैध शस्त्र बाळगणे आदी गंभीर स्वरूपाचे सहा गुन्हे दाखल आहेत. त्यामुळेच त्याच्यावर एपीडीएअंतर्गत स्थानबद्धतेच्या कारवाईचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी अपर पोलीस आयुक्तांकडे पाठविला होता. याच प्रस्तावाची छाननी झाल्यानंतर सुकेशला ९ सप्टेंबर २०२२ रोजी नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात एक वर्षांसाठी स्थानबद्ध केले आहे. शहरात दहशत निर्माण करणाऱ्या तसेच गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त जयजित सिंह यांनी अलीकडेच दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर आठ महिन्यांत १५ अट्टल गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यानुसार स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.