Accused of rape arrested by Thane Police | ठाण्यात लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार करणा-यास अटक

नौपाडा पोलिसांनी केली कारवाई

ठळक मुद्देअश्लील फोटोही केले व्हायरलनौपाडा पोलिसांनी केली कारवाईउत्तराखंड येथे तरुणीला तो नेण्याच्या तयारीत होता

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिचे खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल करणा-या गुरुचरण प्रीतम सहा (२२, रा. ढुमदार, उत्तराखंड) याला नौपाडा पोलिसांनी शनिवारी अटक केली. त्याला १७ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
ठाण्यातील एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करणारा गुरुचरण याने ठाणे रेल्वेस्थानकाजवळ इंग्रजी स्पीकिंगचा क्लास लावला होता. याच क्लासमध्ये त्याची २१ वर्षीय विद्यार्थिनीशी ओळख झाली होती. दोघेही एकाच क्लासमध्ये असल्याचा फायदा घेऊन त्याने तिच्याशी जवळीक साधून विश्वासात घेऊन तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्याच नावाखाली ५ एप्रिल २०१९ रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास मासुंदा तलाव येथील एका लॉजवर नेऊन तिथे तिच्या संमतीशिवाय तिच्याशी त्याने शारीरिक संबंध ठेवले. त्याचवेळी त्याने तिच्या नकळत तिचे अश्लील फोटोही मोबाइलवर काढले. पुन्हा तिला लैंगिक संबंध ठेवण्याचा आग्रह त्याने धरला. तिने नकार दिल्यानंतर मात्र त्याने तिचे हे फोटो तिचे मित्र आणि भावाच्या इन्स्टाग्राम खात्यावर टाकून तिची बदनामीही केली. लैंगिक अत्याचार केल्यानंतरही त्याने तिचे फोटोही व्हायरल केल्यामुळे तिने अखेर याप्रकरणी ८ आॅक्टोबर २०१९ रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध विनयभंग, लैंगिक अत्याचार करणे तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा २००८ चे कलम ६६ (ड) नुसार गुन्हा दाखल केला.
नौपाडा पोलिसांनी ज्या मोबाइलवरून इन्स्टाग्रामवर फोटो टाकले होते, त्याचा क्रमांक मिळवून तांत्रिक विश्लेषण आणि इतर गोपनीय माहितीच्या आधारे गुरुचरण याला वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले, पोलीस निरीक्षक रविंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे, पोलीस हवालदार सुनिल अहिरे, कैलास जाधव, पोलीस नाईक सुनिल राठोड, बाळासाहेब पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल गोरख राठोड आदींंच्या पथकाने सापळा लावून १२ आॅक्टोबर रोजी रात्री गुरुचरण याला अटक केली. तो तिला पुन्हा उत्तराखंड येथे नेण्याच्या तयारीत होता. फोनवरूनच पोलिसांच्या सांगण्यानुसार तिने त्याला संमती दिली. त्यानंतर, त्याला ठाणे रेल्वेस्थानकाजवळ बोलविण्यात आले. तो तिथे आल्यानंतर सापळा लावलेल्या पथकाने त्याला ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानेच तिचे फोटो इन्स्टाग्रामवर टाकल्याचीही कबुली पोलिसांना दिली.

Web Title: Accused of rape arrested by Thane Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.