Video: हायड्रोजन पॅराॅक्साइडचा कंटेनर उलटल्यामुळे कोंडी; गायमुख खाडीजवळ अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 19:43 IST2022-08-02T19:43:42+5:302022-08-02T19:43:57+5:30
Accident Case : चालक जखमी, तीन तासांनंतर कंटेनर बाजूला करण्यात यश

Video: हायड्रोजन पॅराॅक्साइडचा कंटेनर उलटल्यामुळे कोंडी; गायमुख खाडीजवळ अपघात
ठाणे : गुजरातवरून न्हावाशेवा येथे २३ हजार लीटर हायड्रोजन पॅराॅक्साईड घेऊन निघालेल्या कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे कंटेनर उलटल्याची घटना मंगळवारी सकाळी सव्वा सातच्या सुमारास घोडबंदर रोडवरील गायमुख खाडीजवळ घडली. यात चालक अमरीश कुमार (२३) जखमी झाला आहे. उलटलेल्या कंटेनरमधील २० टॅंकमधून वायू गळती झाली तसेच काही काळ वाहतूक कोंडी झाली. सुमारे तीन तासांच्या प्रयत्नानंतर कंटेनर बाजूला करण्यात यश आल्यानंतर हा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
मे न्यू इंडिया अस्सुरन्स प्रा. लिमिटेडच्या मालकीच्या कंटेनरमधून हायड्रोजन पॅराॅक्साइड घेऊन चालक अमरीश कुमार गुजरातवरून नवी मुंबई न्हावाशेवा येथे निघाला होता. सकाळी घोडबंदर रोडने जात असताना गायमुख खाडीजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे कंटेनर उलटला. कंटेनरमधील टॅंकमधील वायू गळती झाल्याने घटनास्थळी माेठ्या प्रमाणात धूर पसरला होता. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी २-पिकअप वाहने, फायर वाहन आणि क्रेन मशीनसह दाखल झाले.
ठाणे : गुजरातवरून न्हावाशेवा येथे २३ हजार लीटर हायड्रोजन पॅराॅक्साईड घेऊन निघालेल्या कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे कंटेनर उलटल्याची घटना मंगळवारी सकाळी सव्वा सातच्या सुमारास घोडबंदर रोडवरील गायमुख खाडीजवळ घडली. यात चालक अमरीश कुमार (२३) जखमी झाला आहे. pic.twitter.com/dC1Wzag8rp
— Lokmat (@lokmat) August 2, 2022
अपघातात चालक अमरीश कुमार याच्या डाव्या पायाला आणि छातीला दुखापत झाल्याने त्याला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, तर क्रेन मशिनच्या सहाय्याने कंटेनर रोडच्या बाजूला करण्यात आला. सुमारे तीन तासांच्या प्रयत्नानंतर कंटेनर रोडच्या बाजुला करण्यात या पथकांना यश आले. कंटेनर बाजूला केल्यानंतर घोडबंदर रोड सर्व वाहनांच्या वाहतूकीसाठी मोकळा करण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.