मासेमारी करताना समुद्रात पडला खलाशी; ४ दिवसांनी मध्यरात्री 'असं' काय घडलं, कुटुंबाला बसला शॉक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 22:20 IST2026-01-07T22:17:19+5:302026-01-07T22:20:21+5:30
दुसरीकडे नाखवा लार्सन व अन्य मच्छीमारांनी नागवंशी ह्याचा शोध चालवला होता.

मासेमारी करताना समुद्रात पडला खलाशी; ४ दिवसांनी मध्यरात्री 'असं' काय घडलं, कुटुंबाला बसला शॉक
धीरज परब
मीरारोड - उत्तनच्या मासेमारी बोटीतून खोल समुद्रात पडलेला ३८ वर्षीय खलाशी हा तासभर पोहत दुसऱ्या बोटीवर आश्रयास गेला. चौथ्या दिवशी तो मध्यरात्री नंतर घरी परतला, तेव्हा नाखवा व कुटुंबियांना शॉक बसला. हा भूत आहे का याची धडकीच त्यांनी घेतली मात्र हा खलाशी खरंच जिवंत परतलेला पाहून मच्छीमार कुटुंबियांना अश्रू अनावर झाले. त्याचा पुनर्जन्म झाला म्हणून मच्छीमारांनी केक कापून वाढदिवस साजरा केला.
भाईंदरच्या उत्तन येथील लार्सन रेमंड बाड्या यांची सीएरा नावाची नौका मासेमारी करिता खोल समुद्रात गेली होती. ३ जानेवारी रोजी पहाटे चारच्या सुमारास बोटीवरचा खलाशी सियाराम नागवंशी हा बोटीतून खाली कधी पडला हेच तांडेल यांना समजले नाही. काही वेळाने तांडेल यांना नागवंशी हा बोटीवर नसल्याचे लक्षात आले. बोट तीन नोटिकल मैलावर असल्याने तांडेल यांनी नाखवाच्या घरी संपर्क करून घडलेली घटना सांगितली. बोट मालक लार्सन रेमंड बाडया यांनी त्याला शोधण्याच्या सूचना तांडेल यांना देत उत्तन सागरी पोलीस ठाण्यात कळवले. पोलिसांनी तुम्ही शोध घ्या व २४ तासानंतर तक्रार नोंद करू असं सांगितले.
दुसरीकडे नाखवा लार्सन व अन्य मच्छीमारांनी नागवंशी ह्याचा शोध चालवला होता. मात्र ६ जानेवारीच्या पहाटे १.३० च्या सुमारास नागवंशी हा उत्तन कोळीवाड्यात परतला. लार्सन व कुटुंबियांना तर विश्वासच बसला नाही. सुरुवातीला घरात भूत आला असं त्यांना वाटले. त्यांनी धर्मगुरू यांना कॉल केला. प्रार्थना करत घराचे सर्व दिवे लावले. त्याला चिमटा काढून खात्री केली. नागवंशी असल्याची खात्री पटताच लार्सन व त्यांच्या पत्नी आणि कुटुंबियांना अश्रू अनावर झाले. त्याला नवीन जीवन मिळाल्याचा आनंद मच्छीमार कुटुंबियांनी नागवंशीच्या हस्ते केक कापून साजरा केला.
बोटीतून पडल्यावर गच्च काळोख आणि समुद्राच्या लाटांवर नागवंशी हे पोहत राहिले. पोहण्यात अडचण होऊ नये म्हणून त्यांनी कपडे काढून टाकले. गच्च काळोखात दूरवर एका बोटीची लाईट दिसली. जीव वाचविण्याच्या जिद्दीने नागवंशी हे जवळपास तासभर समुद्रात पोहत पोहत त्या बोटीवर पोहचले. त्या मच्छीमारांनी नागवंशी ह्याला खाऊ पिऊ घातले. किनाऱ्याला नेऊन सोडले. त्याला पैसे खर्चाला दिले. उरण भागात तो पोहचला असावा अशी शक्यता आहे. महामार्गावर त्याने अंगात घालण्यास कपडे घेतले. तिकडून ठाणे येथून लोकल पकडून भाईंदरला पोहचले. भाईंदर वरून चालत उत्तन गाठले अशी माहिती लार्सन यांनी दिली.
समुद्रात बोटीतून पडल्यानंतर नागवंशी सापडला नसल्याने तो मरण पावला अशी खात्री मच्छीमारांना झाली होती. समुद्र किनाऱ्यास मृतदेह लागला आहे का याचा शोध पण घेतला असल्याचं मच्छीमार नेते मॅलकम कासुघर म्हणाले. रात्री १:३० वाजता अचानक लार्सन रेमंड बाडया यांच्या घराचा दरवाजा वाजल्याने दार उघडले तर समोर सियाराम नागवंशी उभा होता. त्याने घडलेला प्रकार कुटुंबाला सांगितला.