ह्रदयद्रावक... पतीच्या कर्जाला कंटाळून तीन लेकरांच्या गरोदर आईने संपवले जीवन
By जितेंद्र कालेकर | Updated: January 4, 2024 21:21 IST2024-01-04T21:19:49+5:302024-01-04T21:21:12+5:30
वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा: सावरकरनगरमधील घटना

ह्रदयद्रावक... पतीच्या कर्जाला कंटाळून तीन लेकरांच्या गरोदर आईने संपवले जीवन
ठाणे: पतीच्या कर्जाला कंटाळून ठाण्यात प्रियंका लकी गुदरावत (२५) या गरोदर विवाहितेने घरातील हॉलमधील पंख्याला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी ११.३० ते दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तिच्या आत्महत्येच्या कारणाचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सावरकरनगर भागातील आर. जे. ठाकूर कॉलेज समोरील साई बिल्डींग मध्ये ही महिला तिच्या पती आणि मुलांसह वास्तव्याला आहे. पती लकी (२७) हा त्याच इमारतीमध्ये सहाव्या मजल्यावर राहणाऱ्या त्याच्या आईकडे गेला होता. तर तिची पाच व सहा वर्षांची दोन मुले तसेच चार वर्षांची मुलगी त्याच परिसरात होती. घरात कोणी नसतांना गुरुवारी सकाळी प्रियंकाने गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार उघड झाला. त्यानंतर पतीसह नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना हा प्रकार सांगितला. प्रथमदर्शनी पतीच्या कर्जाने तिने आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे. मात्र, यातील नेमकी कारणांचा तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.