भिवंडी - येथील वंजारपट्टी नाका परिसरात सिराज हॉस्पिटलजवळ रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात दुचाकीचालक डॉक्टराचा मृत्यू झाला. डॉ. मोहम्मद नसीम अमिनुद्दीन अन्सारी (वय ५८) असे त्यांचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली आहे. डॉ. अन्सारी जेवण करून मध्यरात्री साडेबारा वाजता दुचाकीने नागाव येथील घरी निघाले होते. त्यावेळी हा अपघात झाला.
स्थानिकांनी वाहतूक रोखली घटनेनंतर नागरिकांनी काही वेळ रस्ता रोखून धरला होता. सहायक पोलिस आयुक्त सचिन सांगळे, निजामपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विश्वास डागळे हे पोलिसांसह घटनास्थळी दाखल होत त्यांनी हस्तक्षेप करून नागरिकांना शांत करीत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर रात्री उशिरा निजामपूर पोलिस ठाण्यात ट्रकचालक मोहम्मद बिलाल मोहम्मद अस्लम यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
‘जबाबदारी महापालिकेची‘घटनेनंतर आ. रईस शेख यांनी पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांची शिष्टमंडळासह भेट घेत डॉक्टराचा मृत्यू खड्ड्यांमुळे झाला असल्याने अपघातास महानगरपालिका प्रशासन जबाबदार असून, संबंधित अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.