लोकल रेल्वेमधून कोसळला आणि वैतरणा नदीत पडला; कशी आणि कोणी केली सुटका? व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 16:56 IST2026-02-12T16:52:26+5:302026-02-12T16:56:20+5:30
पश्चिम रेल्वे मार्गावर एक धक्कादायक घटना घडली. रेल्वेतून प्रवास करत असताना एक तरुण थेट वैतरणा नदीत पडला. हा तरुण बोईसरवरून बोरिवलीकडे निघाला होता.

लोकल रेल्वेमधून कोसळला आणि वैतरणा नदीत पडला; कशी आणि कोणी केली सुटका? व्हिडीओ व्हायरल
रात्री १०-११ वाजताची वेळ होती. रेल्वे कर्मचारी रेल्वे रुळावरून गस्त घालत निघाला होता. त्याला अचानक पुलाखालून आवाज ऐकायला आला. कोणीतरी ओरडत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यांनी पुलाखाली बघितले असता, तिथे कोणीतरी अडकलेले असल्याचे दिसले. त्यानंतर त्यांनी इतर रेल्वे कर्मचारी आणि गावातील लोकांना बोलावले आणि तरुणाला बाहेर काढले. त्यानंतर समोर आले की, तो लोकल रेल्वेतून प्रवास करत असताना नदीत पडला होता.
मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावर लोकल रेल्वेमधून प्रवास करणारा एक तरुण थेट नदीत पडल्याची घटना समोर आली आहे. पालघर जिल्हा हद्दीत ही घटना घडली. तरुण तोल जाऊन वैतरणा नदीत पडला. रात्री १० ते ११ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. गस्तीवर असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यामुळे त्याला वेळेत मदत मिळाली आणि मोठी दुर्घटना टळली. स्थानिक गावकऱ्यांनी त्याला नदीतून बाहेर काढण्यासाठी मदत केली.
बोईसरवरून बोरिवलीकडे निघाला होता उदय
उदय मंगेश वांगड (वय २५, रा. बोईसर) असे तरुणाचे नाव आहे. तो बोईसरवरून बोरिवलीकडे निघाला होता. सफाळे आणि वैतरणा रेल्वे स्थानकादरम्यान वैतरणा नदी आहे. या नदीवर असलेल्या पुलावरूनच तो पात्रात पडला होता.
एक धक्कादायक घटना पश्चिम रेल्वे मार्गावर घडली. रेल्वेतून प्रवास करत असताना एक तरुण थेट वैतरणा नदीत पडला. कर्मचारी आणि गावकऱ्यांनी वेळीच त्याला मदत केली आणि त्याची सुटका केली. हा तरून बोईसरवरून बोरिवलीकडे निघाला होता.#Mumbai#westernrailway#viralvideopic.twitter.com/GoBN9CLzjp
— Lokmat (@lokmat) February 12, 2026
उदयबद्दल कसे कळले?
वैतरणा रेल्वे स्थानक परिसरात ट्रॅक मेंटेनर आणि ब्रिज गार्ड असलेले रमेश सिंह हे रुळावर गस्त घालत होते. रात्री १० ते ११ वाजेदरम्यान डाऊन लाईनवर त्यांना पुलाखालून कुणीतरी आवाज देत असल्याचे जाणवले. त्यांनी डोकावून बघितले, तेव्हा २० खांब असलेल्या या पुलाच्या मध्यभागी १०व्या खांबाला पकडून कोणीतरी आवाज देत होते.
रमेश सिंह यांनी रेल्वेच्या इतर कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली. वाढीव गावातील लोकांनाही त्यांनी याबद्दल सांगितले. त्यानंतर गावातील गुरू पाटील यांनी विलंब न करत साई पाटील यांच्या मदतीने बोट घेऊन नदीच्या पात्रात गेले. पुलाच्या खांबापर्यंत गेल्यानंतर तिथे उदय वांगड हा उभा होता. त्याला त्यांनी बोटीत बसवले.
लोकलमधून पडल्यामुळे उदय जखमी झाला होता. त्याच्यावर वैतरणा रेल्वे स्थानकांच्या कार्यालयातच प्राथमिक उपचार करण्यात आले आणि सकाळी घरी सोडण्यात आले. रेल्वे कर्मचारी आणि गावकऱ्यांनी उदयला नवे आयुष्य दिल्याबद्दल त्याच्या आईने आभार मानले.