भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 20:03 IST2025-11-07T20:02:11+5:302025-11-07T20:03:51+5:30
Bhiwandi Massive Fire: आग भीषण असल्याने सावधगिरी म्हणून संपूर्ण एमआयडीसी परिसराचा विद्युत पुरवठा बंद करण्यात आला होता.

भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
Bhiwandi Fire: भिवंडी-कल्याण रस्त्यावरील सरवली गोवा एमआयडीसी येथील मंगलमूर्ती डाईंग या कपड्यावर रंग प्रक्रिया करणाऱ्या कंपनीत शुक्रवारी सकाळी भीषण आग लागण्याची घटना घडली. तीन मजली असलेल्या या डाईंग कंपनीतील दुसरा आणि तिसरा मजल्यावर मोठ्या प्रमाणावर कच्चा व रंग प्रक्रिया केलेल्या कपड्याचा साठा ठेवलेला असल्याने, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आग लागली होती.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी भिवंडी अग्निशामक दलाची गाडी दाखल झाली. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु केले. आग भीषण असल्याने सावधगिरी म्हणून संपूर्ण एमआयडीसी परिसराचा विद्युत पुरवठा बंद करण्यात आला होता.
पाण्याचा तुटवडा, यंत्रणा ठरली कुचकामी
दरम्यान, आग विझवण्यासाठी पाण्याची कमतरता मोठ्या प्रमाणात भासली. विशेष म्हणजे स्थानिक एमआयडीसीकडील अग्निशामक यंत्रणा सुद्धा या वेळी कुचकामी ठरली. आगीच्या घटनावेळी विद्युत पुरवठा बंद केला जातो अशा परिस्थितीत पर्यायी जनरेटरच्या विद्युत पुरवठ्याची व्यवस्था एमआयडीसी कडून केली गेली नाही .त्यामुळे पाण्याच्या तुटवड्यामुळे आग विझवण्यात अडथळे निर्माण झाले.
दुसरीकडून मागवली मदत
आगीची भीषणता लक्षात घेऊन आग विझवण्यासाठी कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाच्या गाड्या मदतीसाठी बोलावण्यात आल्या होत्या. कोनगाव पोलीस ठाण्याशेजारी असलेल्या या आगीच्या दुर्घटनेनंतर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण रस्ता रहदारीसाठी बंद केला होता.
या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग नक्की कशामुळे लागली हे तपासाअंती समोर येणार आहे.