भाईंदर मध्ये मनमोहक चित्रबलाक पक्ष्यांचा मुक्काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 07:40 IST2025-08-27T07:40:04+5:302025-08-27T07:40:18+5:30
Mira Road: भाईंदर पश्चिमेस कांदळवन आणि पाणथळ क्षेत्रात सध्या उंच मनमोहक अश्या चित्रबलाक अर्थात पेंटेड स्टॉर्क पक्ष्यांचा थवा मुक्कामी आला आहे. मीरा भाईंदर शहरातील मोठ्या प्रमाणात असलेल्या कांदळवन, भरती क्षेत्र, मिठागरे आदी ठिकाणी विविध प्रकारचे बगळे, पाणकावळे तसेच अन्य पक्षी नेहमीच दिसतात.

भाईंदर मध्ये मनमोहक चित्रबलाक पक्ष्यांचा मुक्काम
मीरारोड - भाईंदर पश्चिमेस कांदळवन आणि पाणथळ क्षेत्रात सध्या उंच मनमोहक अश्या चित्रबलाक अर्थात पेंटेड स्टॉर्क पक्ष्यांचा थवा मुक्कामी आला आहे. मीरा भाईंदर शहरातील मोठ्या प्रमाणात असलेल्या कांदळवन, भरती क्षेत्र, मिठागरे आदी ठिकाणी विविध प्रकारचे बगळे, पाणकावळे तसेच अन्य पक्षी नेहमीच दिसतात. थंडीच्या काळात सीगल हे परदेशी पाहुणे देखील भाईंदर पूर्व - पश्चिम खाडी किनारा, वरसावे खाडी पूल आदी परिसरात मुक्कामास येतात. क्वचित फ्लेमिंगोचा थवा देखील दिसून येतो.
सध्या भाईंदर पश्चिमेच्या रेल्वे स्थानक जवळील इंदिरा मार्केट मागे असलेल्या कांदळवन आणि भरती क्षेत्र पाणथळ मध्ये स्थानिक पक्ष्यांसह पेंटेड स्टॉर्क ह्या स्थलांतरित पक्ष्यांचा थवा मुक्कामी आला आहे. करकोचा प्रजाती मधील ह्या पक्ष्यास चामढोक, चित्रबलाक नावाने ओळखले जाते. उंच, मोठे पंख व लांब मोठी पिवळी चोच, पांढऱ्या रंगाचा वर हिरवट काळसर पणा आणि पंखांवर गुलाबी छटा असे आकर्षक चित्रबलाक हे येथील पाणथळीत थव्याने एकत्र उभे असतात. पाण्यातील मासे, साप, बेडूक आदी हे त्यांचे आवडते खाद्य असून आपल्या लांब- मोठ्या चोचीने पाण्यातून आपले खाद्य टिपताना दिसतात.
मीरा भाईंदर मध्ये क्वचितच हे पक्षी आढळून येतात. दुर्मिळ आणि अतिसंरक्षित असलेले हे पक्षी वन्य जीव कायद्या नुसार पण संरक्षित आहेत. त्यांना इजा करणे, मारणे वन कायद्या नुसार गुन्हा आहे.