ठाण्यात माजी नगरसेवकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 13:52 IST2023-02-11T13:52:32+5:302023-02-11T13:52:57+5:30
लाऊडस्पीकरच्या आवाजावरून वाद; महिला व पतीला मारहाण

ठाण्यात माजी नगरसेवकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल
ठाणे : घोडबंदर रोडवरील आनंदनगर येथील एका मैदानात गुरुवारी रात्री सुरू असलेल्या महाराष्ट्र महोत्सवातील लाऊडस्पीकरचा आवाज बंद करण्याची मागणी करणाऱ्या महिलेला काही महिलांनी स्टेजवरून खाली ओढले. माजी नगरसेवक नरेश मणेरा यांच्यासह संबंधितांनी मारहाण करत
महिलेचा विनयभंग केला. तिच्या पतीलाही मारहाण केल्याचा गुन्हा कासारवडवली पोलिस ठाण्यात शुक्रवारी पहाटे दाखल झाला.
४१ वर्षीय महिला वास्तव्यास असलेल्या सोसायटीच्या बाजूला ठाणे महापालिकेच्या मैदानामध्ये मणेरा यांनी महाराष्ट्र महोत्सवाचे आयोजन केले होते. रात्री १०:३० वाजेच्या सुमारास या कार्यक्रमाच्या ठिकाणी लावलेल्या लाऊडस्पीकरच्या मोठ्या आवाजाचा त्रास होत होता. ताे बंद करण्याची विनंती या महिलेने मणेरा तसेच त्यांच्या सहकाऱ्यांना केली. तेव्हा तेथील काही महिलांनी तिला हाताने मारहाण केली आणि नखाने चेहऱ्यावर ओरबाडले. या महिलेला स्टेजवरून खाली ओढून सुमारे १० ते १२ महिला आणि पुरुषांनी मिळून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केल्याचा आराेप आहे.
मणेरा यांनी गळा दाबून बाह्याचे जॅकेट फाडले. त्यानंतर इतर लोकांनीही मारहाण करत विनयभंग केल्याची तक्रार या महिलेने कासारवडवली पोलिस ठाण्यात शुक्रवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास दाखल केली. झटापटीमध्ये सोनसाखळी गहाळ झाली असून, पतीलाही मारहाण झाल्याचे तसेच धमकी दिल्याचे तिने तक्रारीमध्ये म्हटले आहे.
अटकेची नोटीस
कार्यक्रमाच्या ठिकाणी ही महिला आल्यानंतर तिने आधी आवाज बंद करण्याचे आवाहन केले. नंतर लाथ मारून ध्वनी यंत्रणेची तोडफोड केली. महिलांनाही धक्काबुक्की केली, अशी अदखलपात्र तक्रार तिच्याविरुद्ध मणेरा यांच्या समर्थकांनी केली. मणेरा यांना कलम ४१ नुसार अटकेची नोटीस बजावल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली.