गुरुनानक शाळेत ७ वर्षाच्या मुलाचा हात फ्रॅक्चर, उपचारा विना बसून ठेवले एक तास, बाल कल्याण समितीकडे तक्रार
By सदानंद नाईक | Updated: December 4, 2024 22:51 IST2024-12-04T22:48:36+5:302024-12-04T22:51:45+5:30
पालकांनी बाल कल्याण समितीकडे शाळा प्रशासनाची तक्रार केली...

गुरुनानक शाळेत ७ वर्षाच्या मुलाचा हात फ्रॅक्चर, उपचारा विना बसून ठेवले एक तास, बाल कल्याण समितीकडे तक्रार
उल्हासनगर : शहरातील गुरुनानक शाळेत इयत्ता दुसरीमध्ये शिकणाऱ्या ७ वर्षाच्या मुलाचा पाय घसरून पडून हात फ्रॅक्चर झाला. मात्र आई-वडील मुलाला घेण्यासाठी येई पर्यंत १ ते दिड तास मुलाला शाळा प्रशासनाने उपचारा विना बसून ठेवल्याचे उघड झाले असून पालकांनी बाल कल्याण समितीकडे शाळा प्रशासनाची तक्रार केली.
उल्हासनगर कॅम्प नं-४ परिसरात प्रसिद्ध गुरुनानक इंग्रजी माध्यमाची शाळा असून शाळेतील इयत्ता दुसरी मध्ये ७ वर्षाचा अर्णव राजेश इंगळे हा शिक्षण घेतो. मंगळवारी दुपारी ३ वाजता संगणक क्लासला शिक्षक मुलांना घेऊन जात होते. यावेळी अर्णव याचा पाय घसरून खाली पडला. त्याच्या हाताला लागले. शाळा प्रशासनाने त्वरित आई व वडिलांना याबाबत माहिती दिल्यावर, कामावरून एक ते दिड तासाने आई व वडील शाळेत आले. मुलाला रुग्णालयात नेण्या ऐवजी उपचारा विना एका ठिकाणी तब्बल एक ते दिड तास मुलाला बसून ठेवाल्याचा आरोप आई आम्रपाली इंगळे यांनी केला. मुलाला परिसरातील शिवनेरी रुग्णालयात शिक्षकांच्या मदतीने नेल्यावर एक्सरे मध्ये मुलाच्या हाताचे हाड फ्रॅक्चर झाल्याचे उघड झाले.
शिवनेरी रुग्णालयात मुलावर उपचार सुरु असून शाळेच्या शिक्षकांनी मुलाच्या तब्येती विषयी विचारणा केली. मात्र शाळा प्रशासनाने मुलाला उपचार देण्यास दाखविलेल्या हलगर्जीपणा बाबत पालकांनी नाराजी व्यक्त करीत, याप्रकाराची बाल कल्याण समिती तसेच विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलीस व बाल कल्याण समिती हे शाळा प्रशासनावर काय कारवाई करतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले. मुलाच्या उपचाराचा खर्च उचलण्याची तयारी शाळा प्रशासनाने दाखविल्याची माहिती विश्वासनीय सूत्राकडून मिळाली असून शाळा प्रशासना सोबत याबाबत संपर्क झाला नाही.