ठाणे - ग्रामीण भागात ‘जलजीवन मिशन’अंतर्गत ‘हर घर नल से जल’ ही योजना गेल्या सात वर्षांपासून राबवण्यात येत आहे. परंतु योजनेच्या कूर्मगतीमुळे आजही ६७ हजार ५७४ घरगुती नळजोडण्या देणे बाकी असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे.
ठाणे जिल्ह्यात या योजनेंतर्गत २०२४ अखेरपर्यंत ग्रामीण भागातील सर्व घरांत नळजोडणी देण्याचे उद्दिष्ट होते. योजनेंतर्गत ७२० कामे हाती घेण्यात आली. यामध्ये ४२० रेट्रोफिटिंग व ३०० नवीन योजनांचा समावेश होता. यासाठी ७१५६ कोटींचा आरखडा तयार केला. मात्र, योजनेची गती मंद असल्याने आजही ६७ हजार ५७४ घरांमध्ये नळजोडणी देणे शिल्लक आहे.
पाण्यासाठी पायपीटठाणे ग्रामीण भागातील गाव-पाड्यांमधील महिला व मुलींना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. विहीर तसेच बोअरवेलवर जाऊन डोक्यावर हंडे, कळशा घेऊन पाणी आणावे लागते. ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला जलजीवन मिशन योजना राबविण्याच्या सूचना केल्या. झेडपीला देण्यात आलेल्या उद्दिष्टापैकी ७४.१४ टक्क्यांहून अधिक कामे पूर्ण झाली.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून यापैकी काही मोठ्या योजना राबविण्यात येत आहेत. त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या कामांचे उद्दिष्टे पूर्ण होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
अशी झाली नळजोडणी जिल्ह्यात २०१९ मध्ये ग्रामीण भागात २ लाख ३४ हजार ६१२ कुटुंब होती. त्यापैकी ६६ हजार ७५ कुटुंबांना नळजोडणी देण्यात आली. सध्याच्या घडीला ग्रामीण कुटुंबांच्या संख्येत वाढ होऊन ती २ लाख ६१ हजार २७१ वर पोहोचली. जिल्हा परिषद प्रशासनाने पाणीटंचाईची दाहकता ओळखून या योजनेला गती देत, १ लाख ९३ हजार ६९७ कुटुंबाना घरगुती नळजोडणी दिल्याचा दावा केला.