मोबाइल व्हॅनद्वारे ४६ लाखांचा कर वसूल, ठामपाचा उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 00:11 IST2020-12-08T00:10:07+5:302020-12-08T00:11:59+5:30
Thane News : नागरिकांना त्यांच्या दारातच मालमत्ताकर भरता यावा यासाठी आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या संकल्पनेतून सुरू केलेल्या मोबाइल व्हॅनला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मोबाइल व्हॅनद्वारे ४६ लाखांचा कर वसूल, ठामपाचा उपक्रम
ठाणे - कोरोनाच्या काळात ठाणेकारांना मालमत्ताकर भरण्यास सुलभ व्हावे या उद्देशाने ठाणे महापालिकने मोबाइल व्हॅनचा आधार घेतला आहे. त्यानुसार मागील दीड महिन्यात ३७० नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेतला असून, त्या माध्यमातून ४६ लाखांचा मालमत्ताकर वसूल झाला आहे.
नागरिकांना त्यांच्या दारातच मालमत्ताकर भरता यावा यासाठी आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या संकल्पनेतून सुरू केलेल्या मोबाइल व्हॅनला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. करदात्याच्या दारी जाऊन कर वसूल करण्याच्या दृष्टिकोनातून बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या सहकार्याने स्मार्ट कर संग्रह प्रणाली ही मोबाइल व्हॅन तयार केली आहे. ती पूर्णत: रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या प्रमाणकानुसार असून संगणक, प्रिंटर व त्याकरिता लागणाऱ्या सर्व सुविधा तसेच ऑपरेटर, ड्रायव्हर आणि सुरक्षारक्षकही त्यात आहे. याबाबतचा सर्व खर्च बँक ऑफ महाराष्ट्रने केला आहे. या व्हॅनद्वारे एखाद्या गृहनिर्माण संस्थेमध्ये मालमत्ताकर वसूल करावयाचा असल्यास ती त्या प्रभाग कार्यालयाकडे पाठविण्यात येते. या व्हॅनद्वारे करदात्यांनी देयकाची मागणी केल्यास तेसुद्धा देण्यात येत आहे. यामध्ये मालमत्ताकर रोखीने, धनादेश, धनाकर्ष अथवा डेबिट कार्ड, एटीएम कार्डनेदेखील भरण्याची व्यवस्था आहे. पावती देण्याची व्यवस्थाही व्हॅनमध्ये आहे.
१५ ऑक्टोबरपासून या उपक्रमाला सुरुवात केली असून ती ९ प्रभाग समित्यांमध्ये फिरत आहे. या व्हॅनच्या माध्यमातून आतापर्यंत ३७० नागरिकांनी आपल्या मालमत्ताकराचा भरणा केला असून, याचा सर्वाधिक फायदा हा सिनियर सिटीजनना झाला आहे. बऱ्याच नागरिकांना ऑनलाइन मालमत्ताकर भरता येत नसून दुसरीकडे कोरोना काळात कार्यालयात जाऊन तो भरणे शक्य नसल्याने हा उपक्रम चांगलाच उपयोगी पडला आहे.
सुटीच्या दिवशीही कॅम्प
एखाद्या गृहनिर्माण संस्थेने मालमत्ताकर भरण्याकरिता व्हॅनची मागणी केल्यास ती संबंधित गृहनिर्माण संस्थेमध्ये पाठवून कराचे संकलन करण्यात येत आहे. सुटीच्या दिवशी अथवा इतर दिवशी संस्थेमध्ये कॅम्प राबविण्यात येत असून या वसुलीसाठी मोबाइल व्हॅनचा उपयोग होत आहे.