मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 00:19 IST2025-08-27T00:19:18+5:302025-08-27T00:19:38+5:30

इमारतीच्या सदनिकेतील स्लॅब पडून एका ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला, तर त्याचे वडील आणि अन्य दोन महिला जखमी झाल्या आहेत. 

4-year-old boy dies after slab of flat collapses in Mira Road; three injured | मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 

मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 

मीरारोडच्या नया नगर भागातील एक सुमारे ४० वर्ष जुन्या इमारतीच्या सदनिकेतील स्लॅब पडून एका ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला तर त्याचे वडील आणि अन्य दोन महिला जखमी झाल्या आहेत. 

नया नगरच्या झुडीओ स्टुडिओ समोर नुरजहां ह्या इमारतीचे १९८५ साली बांधकाम सुरु झाले होते.  १८ फ्लॅट व १३ दुकाने असलेली सदर ४ मजली इमारत जीर्ण अवस्थेत आहे.  मंगळवारी नूरजहाँ इमारत क्र. ५१ ह्या इमारती मधील सदनिका क्र . ३०२ च्या बेडरूमचे फ्लोरिंग स्लॅब खालच्या २०२ क्र. च्या सदनिकेत कोसळले. 

तिसऱ्या मजल्याच्या सदनिकेत राहणाऱ्या फरिदा खान व नासिरा खान ह्या देखील घरातील सामान व स्लॅब सह खाली पडल्या. तर सदनिका क्र . २०२ च्या बेडरूम मध्ये असलेल्या नसीम मोहम्मद युनूक अन्सारी (वय ४६) आणि त्यांचा ४ वर्षांचा मुलगा अब्दुल आहाद यांच्या अंगावर स्लॅब पडल्याने त्याखाली दोघेही अडकले. 

नसीमची पत्नी अमरीन, भाऊ नईम व त्यांची पत्नी सुलताना आदी स्लॅब पडल्याचे पाहून बेडरूम मध्ये धावले. त्यांनी व शेजाऱ्यांनी ढिगाऱ्या खालील नसीम व अब्दुल ह्याला बाहेर काढून नजीकच्या रुग्णालयात नेले. मात्र चिमुरड्या अबुल याचा आधीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले तर नसीम वर उपचार सुरु आहेत. फरीदा व नासिरा यांना देखील लागले आहे. 

सदरील घटने नंतर अतिरिक्त आयुक्त प्रियांका राजपूत, अग्निशमन दल प्रमुख प्रकाश बोराडे, प्रभाग अधिकारी जितेंद्र कांबळे, नया नगर पोलीस आदींनी घटनास्थळी पाहणी केली. सदर इमारत रिकामी करून पालिकेने सील केली आहे. लोकांना तातडीने राहण्यासाठी हैदरी चौक येथील पालिका सभागृहात व्यवस्था केली गेली आहे. बहुतांश लोकं भाड्याने राहणारे होते. 

महापालिकेचा हलगर्जीपणा 
हि इमारत इतकी जुनी व जीर्ण धोकादायक अवस्थेत दिसत असताना देखील महापालिकेने  त्याकडे दुर्लक्ष केले. गेल्यावर्षी डिसेम्बर मध्ये सदर इमारतीचा संचरणात्मक तपासणी अहवाल  सादर करण्याची नोटीस तेथील पदाधिकारी यांना दिली गेली असे पालिका सांगत असली तरी नोटीस दिल्या नंतर इतके महिने दुर्लक्ष केल्याने दुर्घटना घडून ४ वर्षांच्या चिमुरड्याचा बळी गेल्याचा आरोप जागरूक नागरिकांनी केला आहे.

Web Title: 4-year-old boy dies after slab of flat collapses in Mira Road; three injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.