उल्हासनगरात प्रधानमंत्री आवास योजनेतुन उभारली जाणार ३ हजार ५७८ परवडणारी घरे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 18:51 IST2025-11-18T18:49:09+5:302025-11-18T18:51:41+5:30
घरांच्या उभारणीसाठी ७२३ कोटी रुपयांची निविदा जाहीर; खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश

उल्हासनगरात प्रधानमंत्री आवास योजनेतुन उभारली जाणार ३ हजार ५७८ परवडणारी घरे!
केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजने अंतर्गत महापालिकेने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी, ३ हजार ५७८ घरांच्या बांधकामाची निविदा जाहीर केली. यासाठी ७२३ कोटी ११ लाख ३८ हजार रुपयाचा निधी निश्चित करण्यात आला. आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी या योजनेबाबत दुजोरा दिला असून खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी यासाठी पाठपुरावा केला होता.
उल्हासनगरात प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी शहर पूर्वेतील संतोषनगर व प्रेमनगर टेकडी येथे गृहनिर्माण प्रकल्प हाती घेतला. या अंतर्गत ३ हजार ५७८ घरांच्या बांधकामासाठी निविदा जाहीर केली. या संपूर्ण प्रकल्पाचा अंदाजित खर्च ७२३ कोटी ११ लाख ३८ हजार रुपये असा निश्चित करण्यात आला. शहरातील गृहनिर्माणाची वाढती गरज लक्षात घेता, कमी उत्पन्न गटातील नागरिकांना सुरक्षित, सुव्यवस्थित आणि परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत या घरांचे वाटप पात्र लाभार्थ्यांना शासकीय नियमांनुसार केले जाईल.
शहरात विविध विकास प्रकल्प मार्गी लागले असून बहुतांश रस्त्यांचे काँक्रीटीकरण झाल्याने वाहतुकीला गती मिळणार आहे. तसेच शहरातील अनधिकृत इमारतींचा गंभीर प्रश्न मार्गी लावण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी राज्य सरकारकडे याबाबत सातत्याने पाठपुरावा केला. अखेर अनधिकृत इमारतींचा देखील पुनर्विकास करण्याचा शासनाकडून निर्णय घेण्यात आल्याने, हजारो कुटुंबाना मोठा दिलासा मिळाला. असे शिंदे यांच्या कार्यालयाकडून काढलेल्या प्रसिद्धपत्रकात म्हटले आहे.
संतोषनगर व प्रेमनगर टेकडी येथे गृहप्रकल्प
शहर पूर्वेतील संतोषनगर व प्रेमनगर टेकडी येथील भूखंडांवर १ हजार ७८९ आणि १ हजार ७८९ अशी एकूण ३ हजार ५७८ घरे निर्माण केली जाणार आहेत. या घरांसोबतच पक्के रस्ते, पाणीपुरवठा व्यवस्था, मलनिस्सारण जाळे, वीजपुरवठा व्यवस्था, समाजोपयोगी मूलभूत सुविधा, तसेच स्वयंपूर्ण वसाहतीसाठी आवश्यक सर्व नागरी सुविधा उभारण्यात येतील. या प्रकल्पा अंतर्गत सर्वेक्षण, मातीची चाचणी, आराखडा व नकाशे तयार करणे, वास्तू उभारणी, तसेच घरांच्या सोबतच सर्व आवश्यक अंतर्गत व बाह्य पायाभूत सुविधा तयार करण्याची जबाबदारी निविदा प्रक्रियेद्वारे निवडलेल्या कंत्राटदाराकडे सोपविण्यात येणार आहे.