२३६ कोटींचा रॉ वॉटर प्रकल्प केला रद्द, स्टेमच्या मनमानीची चिरफाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 00:42 IST2020-12-22T00:42:20+5:302020-12-22T00:42:40+5:30
Thane : ठाणे महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात ही बैठक पार पडली. या बैठकीला ठाण्यासह मीरा-भाईंदर आणि भिवंडी महापालिका आयुक्तांसह जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

२३६ कोटींचा रॉ वॉटर प्रकल्प केला रद्द, स्टेमच्या मनमानीची चिरफाड
ठाणे : बदलापूर येथे स्टेमच्या माध्यमातून २३६ कोटी रुपयांचा खर्चीक असा रॉ वॉटर प्रकल्प आणि पम्पिंग स्टेशन उभारण्यात येणार होते. यासाठी सल्लागाराचीही नेमणूक केली होती. परंतु, पम्पिंग स्टेशन उभारताना कोणत्याही स्वरूपाची संचालक मंडळांची मंजुरीच घेतली नसल्याचे सोमवारी झालेल्या बैठकीत उघड झाले. त्यामुळे स्टेम प्राधिकरणाच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष असलेले महापौर नरेश म्हस्के यांनी हा प्रकल्पच रद्द करण्याचे आदेश दिले. विशेष म्हणजे तो व्यवहार्य नसतानाही कसा राबविला जात आहे, असा सवालही त्यांनी यावेळी केला.
ठाणे महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात ही बैठक पार पडली. या बैठकीला ठाण्यासह मीरा-भाईंदर आणि भिवंडी महापालिका आयुक्तांसह जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत स्टेमकडे जाणाऱ्या रस्त्यावर पूल बांधण्याच्या कामाचा प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर ठेवला होता. परंतु, सर्वाधिक पैसे देऊनही जर स्टेमकडून विकासकांसाठी रस्ता दिला जात असेल, त्यांच्यासाठी उड्डाणपूल उभारले जात असतील, किंवा तेथील हाउसिंग कॉम्प्लेक्सला नव्याने परवानगी दिली जात असेल तर ते खपवून घेणार नसल्याचा इशाराही यावेळी म्हस्के यांनी दिला.