भरधाव कारच्या धडकेत २१ वर्षीय दर्शन हेगडेचा मृत्यू; 'हिट अँड रन' प्रकरणाने ठाण्यात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 10:52 IST2024-10-22T10:51:20+5:302024-10-22T10:52:16+5:30
अपघातावेळी भरधाव कार चालवण्याची स्पर्धा सुरू होती. त्यात कारचालकाने मद्य प्राशन केल्याचा आरोप मृताच्या नातेवाइकांनी केला.

भरधाव कारच्या धडकेत २१ वर्षीय दर्शन हेगडेचा मृत्यू; 'हिट अँड रन' प्रकरणाने ठाण्यात खळबळ
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ठाण्यातील नितीन कंपनीजवळ रविवारी उत्तररात्री १:५० वाजता हिट अँड रनच्या घटनेत एका आलिशान कारने दुचाकीचालक दर्शन हेगडे (२१) याला चिरडले. या घटनेत दर्शन याचा मृत्यू झाला असून या घटनेनंतर चालक पसार झाला आहे. अपघातावेळी भरधाव कार चालवण्याची स्पर्धा सुरू होती. त्यात कारचालकाने मद्य प्राशन केल्याचा आरोप मृताच्या नातेवाइकांनी केला.
संत ज्ञानेश्वरनगरमधील साईकृपा सदन चाळीत दर्शन वास्तव्याला होता. ताे रविवारी उत्तररात्री १:३० वाजता दुचाकीवरून जेवण आणण्यासाठी वागळे इस्टेट येथे गेला होता. तेथून घरी परतत असताना नितीन जंक्शन येथे नाशिक हायवेने मुंबईकडे जाणाऱ्या आलिशान कारने भरधाव वेगाने दर्शन याच्या मोटारसायकलला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, दर्शन याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघातानंतर कारचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी दिशित ठक्कर यांनी नौपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सीसीटीव्ही फुटेजद्वारे कारचालकाचा शोध सुरू केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
...तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही
जोपर्यंत कारचालकाला अटक केली जात नाही, तोपर्यंत दर्शन याचा मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय त्याच्या नातेवाइकांनी घेतला आहे. घटना घडली तेव्हा कारची स्पर्धा लागली होती आणि कार चालवणाऱ्यांनी मद्यप्राशन केले होते, असाही आराेप हाेत आहे. नंबरप्लेट जागेवर मिळालेली असतानाही संबंधित कारचालकाला अटक केली जात नसल्याने मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय हेगडे कुटुंबीयांनी घेतला आहे.