गावपाड्यांतील रस्त्यांच्या डागडुजीसाठी हवेत 20 कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 23:53 IST2020-11-26T23:53:03+5:302020-11-26T23:53:12+5:30
शहापूर, मुरबाडमध्ये पावसामुळे रस्त्यांचे नुकसान

गावपाड्यांतील रस्त्यांच्या डागडुजीसाठी हवेत 20 कोटी
सुरेश लोखंडे
ठाणे : मुंबई महानगराला लागून असलेला ठाणे जिल्हा चार हजार २१४ चौकिमीमध्ये विस्तारला आहे. मुंबई गाठण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील रस्ते महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. पण, आजही या जिल्ह्यातील गावपाड्यांना जोडणारे रस्ते जीवघेणे ठरत आहेत. यंदाच्या सर्वाधिक दोन हजार ६५२.४१ मिमी पावसामुळे जिल्ह्यातील या रस्त्यांची चाळण झाली आहे. निखळून पडलेली खडी आणि त्यात खड्ड्यांचे साम्राज्य असलेल्या रस्त्यांच्या डागडुजीसाठी २० कोटी रुपयांच्या निधीची अपेक्षा ठाणे जिपच्या बांधकाम विभागाने केली आहे.
जिल्ह्यात ४३१ ग्रामपंचायतींच्या गावपाड्यांना जोडण्याचे काम व या गावांचा विकास साधण्यासाठी उत्तम दर्जाचे रस्ते आणि त्यावरील दळणवळणाची साधणे आवश्यक आहे. पण, या रस्त्यांची दयनीय अवस्था ग्रामस्थांच्या जीवावर उठली आहे. त्यात यंदा पावसाच्या मनमानी संततधारेमुळे रस्त्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. आदिवासी, दुर्गम भागाच्या शहापूर तालुक्यात यंदा ९३.७३ मिमी, मुरबाड तालुक्यात ६८.४१ मिमी पाऊस पडला आहे. त्यामुळे रस्त्यांचे होत्याचे नव्हते झाले आहे. याप्रमाणेच भिवंडी, कल्याण व अंबरनाथच्या रस्त्यांमुळे गावखेड्यांचे रहिवासी मेटाकुटीला आले आहेत. या खराब रस्त्यांमुळे एसटी बसही वेळेवर धावत नाहीत.
रस्ता दुरूस्तीसाठी २० कोटी एवढ्या निधीची मागणी
जिल्ह्यात ३१००.०२९ किमी लांबीचे रस्ते
इतर जिल्हामार्ग - ६४०.३९५ किमी
ग्रामीण मार्ग-२४५९ किमी.
त्यापैकी २२ किमी लांबीचे खड्डे आहेत.
ठरावाचा लाभ कमी
३,१०० किमीचे गावरस्ते (व्हीर) इतर जिल्हा मार्गात (ओडीआर) समाविष्ट करा व ओडीआरचे मुख्य जिल्हामार्गात (एमडीआर) रूपांतर करा, असा ठराव जानेवारी २०१९ च्या डीपीसीत झाला. पण, त्याचा लाभ काहींनीच घेतलाय.
चांगल्या रस्त्यांअभावी ग्रामस्थांचे हाल
जिल्ह्यातील बहुतांश गावपाड्यांना अजूनही रस्त्यांचा अभाव असल्यामुळे आदिवासी बांधवांना आजही महिला, भगिनींना झोळी करून रुग्णालयात औषधोपचार व प्रसूतीसाठी शहरात आणावे लागत असल्याचे वास्तव ठाणे जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.