१२ वर्षे तुरुंगात; वॉचमनला भरपाई देणार तरी कोण? चिमुरडीवर अत्याचार करणार खरा आरोपी आजही मोकाटच 

By जितेंद्र कालेकर | Updated: May 22, 2025 09:46 IST2025-05-22T09:46:19+5:302025-05-22T09:46:43+5:30

जितेंद्र कालेकर - ठाणे :  पोलिस तपासातील त्रुटींमुळे तीन वर्षे नऊ महिन्यांच्या चिमुकलीचे अपहरण, बलात्कार आणि तिच्या हत्येच्या गुन्ह्यातील ...

12 years in prison; Who will compensate the watchman? The real accused of torturing the little girl is still at large | १२ वर्षे तुरुंगात; वॉचमनला भरपाई देणार तरी कोण? चिमुरडीवर अत्याचार करणार खरा आरोपी आजही मोकाटच 

१२ वर्षे तुरुंगात; वॉचमनला भरपाई देणार तरी कोण? चिमुरडीवर अत्याचार करणार खरा आरोपी आजही मोकाटच 

जितेंद्र कालेकर -

ठाणे :  पोलिस तपासातील त्रुटींमुळे तीन वर्षे नऊ महिन्यांच्या चिमुकलीचे अपहरण, बलात्कार आणि तिच्या हत्येच्या गुन्ह्यातील रामकिरत गौड या सुरक्षारक्षकाला झालेली फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली. 
गेली १२ वर्षे तो तुरुंगात खितपत होता. रामकिरत निर्दोष ठरल्याने त्याच्या आयुष्यातील या १२ वर्षांची भरपाई कोण आणि कशी करणार? अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या आरोपामुळे रामकिरतपासून त्याची पत्नी, मुलगी दुरावली असेल. 

कौटुंबिक जीवन उद्ध्वस्त झाले असेल. त्याच्या संसाराची विस्कटलेली घडी कोण बसवून देणार? तुरुंगात कुप्रसिद्ध गुंडांसोबत त्याला राहावे लागले. त्याच्यावर हल्ले, अत्याचार झाले असतील. त्या जखमा कशा भरणार? रामकिरत हा वॉचमन असल्याने त्याने हे सर्व सोसलेच पाहिजे का? समजा, त्याच्या जागी कुणा बड्या नेत्याचा, बिल्डर-उद्योगपतीचा किंवा अभिनेत्याचा मुलगा असता तर ठाणे पोलिसांनी याच बेफिकिरीने तपास करून त्याला तुरुंगात डांबले असते का? याचा जाब ठाणे पोलिसांनी दिलाच पाहिजे.

ठाण्यातील वाघबीळ गावात ३० सप्टेंबर २०१३ राेजी घराबाहेर खेळत असलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले. दाेनच दिवसांनी घराजवळील पाण्याच्या डबक्यात तिचा मृतदेह आढळला. यामध्ये रामकिरतला अटक झाली. तेव्हापासून ताे तुरुंगातच हाेता. 

कासारवडवली पाेलिसांनी त्याच्याविरुद्ध खटलाही दाखल केला.  त्याला ८ मार्च २०१९ राेजी फाशीची शिक्षा सुनावली. याच शिक्षेवर २५ नाेव्हेंबर २०२१ राेजी उच्च न्यायालयानेही शिक्कामाेर्तब केले. 

आराेपीच्या चपलेला लागलेला  चिखल आणि मुलीचा मृतदेह सापडलेल्या डबक्यातील चिखल यांच्यातील साधर्म्य आणि आराेपीने त्याच्या मुकादमाकडे दिलेली कबुली तसेच पीडितेसाेबत आराेपीला तीन साक्षीदारांनी पाहिल्याची साक्ष हे खालच्या दाेन्ही न्यायालयांनी गुन्हा सिद्धी व शिक्षेसाठी ग्राह्य धरलेले पुरावे सर्वोच्च न्यायालयाने तकलादू आणि अविश्वसनीय ठरवले.

पोलिसांकडून सखोल तपास गरजेचा
काही पाेक्साे गुन्ह्यांत आराेपी न मिळाल्याने भलताच आराेपी पकडला जाताे. सरकार, नागरिकांचे पाेलिसांवर अशा गुन्ह्यामध्ये प्रचंड दबाव असताे. त्यामुळे निर्दोष आराेपीला पकडले जाण्याची अनेकदा शक्यता असते. पाेलिसांनी सखाेल तपास करणे आवश्यक आहे. 
ॲड. सुनील रवाणे, ठाणे.

पोक्सो प्रकरणातील दबावापोटी कारवाई
बलात्कारासारख्या संवेदनशील प्रकरणात दीर्घकाळ आरोपी सापडला 
नाही तर जनक्षोभ वाढतो. त्यामुळे अशा संवेदनशील प्रकरणात झटपट आरोपीच्या मुसक्या आवळल्या, हे दाखवून देण्यासाठी पोलिस घिसाडघाईने कारवाई करतात, हेच या प्रकरणात अधोरेखित झाले.

 रामकिरत निर्दोष असेल तर याचा अर्थ त्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या करणारा खरा आरोपी मोकाट आहे. १२ वर्षे खरा आरोपी पोलिसांनी शोधला नाही हे दुर्दैवी आहे. गोरगरीब व्यक्तीला थर्ड डिग्री दाखवून पोलिस अनेकदा गुन्हे कबूल करायला लावतात. मात्र न्यायालयात पोलिसांचे हे ढोंग टिकत नाही. त्याचाच हा पुरावा.  

पाेक्साेसारख्या गुन्ह्यात आराेपीला पकडण्यासाठी पाेलिसांना जबाबदार धरले जाते. त्यामुळे घाईतच एखाद्या निरपराधालाही अटक हाेते. या प्रकरणात आराेपीला नुकसानभरपाई मिळणेही अपेक्षित असल्याचे मत काही वकिलांनी व्यक्त केले.  

अन्य प्रकरणांतही दोषसिद्धीत अपयश 
ठाणे पोलिसांची बेअब्रू होण्याचे हे एकमेव प्रकरण नाही. वागळे इस्टेट परिसरातील ४० वर्षे जुन्या सोन्या-चांदीच्या पेढीच्या मालकिणीने पेढीतील तीन तरुण कारागिरांवर २०१८ मध्ये वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला हाेता. यात ठाणे न्यायालयाने दिवाकर साठ (२५) आणि संजीव मैती (२४) यांची अलीकडेच निर्दाेष मुक्तता केली. 

आपल्याच पाच महिन्यांचा मुलाचा खून केल्याच्या आराेपातून शांतीबाई चव्हाण या महिलेची ठाणे न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. दोषसिद्धीतील अपयशाची ही प्रकरणे पोलिस तपासातील उणिवा स्पष्ट करतात.

Web Title: 12 years in prison; Who will compensate the watchman? The real accused of torturing the little girl is still at large

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.