Djokovic, Federer and Nadal are eager to win another one | जोकोव्हिच, फेडरर आणि नदाल आणखी एका जेतेपदासाठी उत्सुक
जोकोव्हिच, फेडरर आणि नदाल आणखी एका जेतेपदासाठी उत्सुक

लंडन : नोव्हाक जोकोव्हिच, रॉजर फेडरर आणि राफेल नदाल हे सोमवारपासून सुरु होणाऱ्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेत जेतेपद पटकावत आणखी एका चषकावर नाव कोरण्यास उत्सुक आहेत. महिला विभागात अ‍ॅश्ले बार्टी विम्बल्डनमध्ये आॅस्ट्रेलियाचा दुष्काळ संपविण्यासाठी प्रयत्नशील राहील.
जागतिक क्रमवारीतील अव्वल जोकोव्हिच गतविजेता असून तो येथे पाचव्या जेतेपदाच्या प्रयत्नात आहे. दुसरा मानांकीत फेडरर येथे नववे जेतेपद पटकावू शकतो, तर दोनवेळचा विजेता नदाल फ्रेंच ओपन व विम्बल्डनमध्ये सलग जेतेपद पटकावण्यास उत्सुक आहे.
वर्षभरापूर्वी ज्यावेळी जोकोव्हिच येथे खेळण्यासाठी आला होता त्यावेळी त्याच्या कारकिर्दीचा आलेख उतरणीला लागला होता. त्याच्या कोपरावर शस्त्रकिया झाली होती. त्यावेळी त्याची क्रमवारी २१ होती. पण, आठवडाभरानंतर जोकोव्हिचने २०१८ मध्ये जेतेपद पटकावले होते. २०११, २०१४ व २०१५ नंतर हे त्याचे चौथे विजेतेपद ठरले होते. जोकोव्हिच आंद्रे आगासीनंतर क्रमवारीत खालच्या स्थानी असल्यानंतरही जेतेपद पटकावणारा खेळाडू ठरला होता. त्यानंतर त्याने तिसरे अमेरिकन व सातवे आॅस्ट्रेलियन जेतेपद पटकावले.
२१ वे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावण्यासाठी प्रयत्नशील असलेला फेडरर १९९९ मध्ये पहिल्यांदा विम्बल्डन स्पर्धेत सहभागी झाला होता. जर त्याने नववे जेतेपद पटकावले, तर
३८ व्या वर्षी ग्रँडस्लॅम चॅम्पियन ठरणारा तो सर्वांत वयस्कर खेळाडू ठरेल. त्याला एका ग्रँडस्लॅममध्ये १०० विजय नोंदवण्याचा पराक्रम करणारा पहिला खेळाडू ठरण्यासाठी केवळ पाच विजयांची गरज आहे. फेडरर मंगळवारी द. आफ्रिकेच्या लॉयड हॅरिसच्या आव्हानाला सामोरे जाईल.
नदाल फ्रेंच ओपनममध्ये १२ वे जेतेपद पटकावत लंडनमध्ये दाखल झाला. क्रमवारीत दुसºया स्थानी असलेल्या नदालला येथे तिसरे मानांकन आहे. त्याने २००८ व २०१० मध्ये जेतेपद पटकावले होते. तो पहिल्या फेरीत जपानच्या युईची सुगिताविरुद्ध खेळेल. विम्बल्डनच्या जेतेपदासाठी गेल्या १७ वर्षांत कुणी जोकोव्हिच, फेडरर, नदाल व अँडी मरे यांच्या व्यतिरिक्त दुसरे नाव घेतलेले नाही.
मात्र असे असले तरी गेल्या काही स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करणारे डॉमनिक थिएम, अलेक्झँडर ज्वेरेव आणि स्टेफानोस सिटसिपास हे क्रमवारीत पुढील तीन स्थानांवर आहेत. या तिघांची स्पर्धेत आगेकूच झाली, तर ते वरील तिन्ही दिग्गजांचे स्वप्न धुळीस मिळवू शकतील. त्यामुळेच या स्पर्धेत दिग्गजांना या तिन्ही खेळाडूंचे विशेष आव्हान राहील. (वृत्तसंस्था)

महिलांमध्ये अ‍ॅश्ले बार्टीकडे सर्वांच्या नजरा
आॅस्ट्रेलियाची २३ वर्षीय खेळाडू अ‍ॅश्ले बार्टी गेल्या आठवड्यात क्रमवारीत अव्वल स्थानी आली. तिने मायदेशातील सहकारी इवोने गुलागोंग कावलेच्या कामगिरीची बरोबरी केली, पण विम्बल्डनमध्ये तिला तिसºया फेरीच्या पुढे मजल मारता आलेली नाही.
सातवेळा जेतेपदाचा मान मिळवणाºया सेरेना विलियम्सवर आता वयाचा प्रभाव दिसत आहे. नाओमी ओसाका सूर गवसण्यासाठी संघर्ष करीत आहे. दोनदा जेतेपद पटकावणारी पेत्रा क्विटोवा दुखापतीनंतर पुनरागमन करीत आहे. बार्टीला गत चॅम्पियन अँजेलिक कर्बरकडून कडवे आव्हान मिळण्याची शक्यता आहे.


Web Title:  Djokovic, Federer and Nadal are eager to win another one
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.