Australian Open 2026 : जोकोविचच स्वप्न अधुरेच! फायनल जिंकत 'करिअर ग्रँड स्लॅम'सह अल्काराझनं रचला इतिहास
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 17:32 IST2026-02-01T17:29:22+5:302026-02-01T17:32:32+5:30
ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या फायनलमध्ये जोकोविचला पराभूत करणारा तो पहिला टेनिस स्टार ठरला.

Australian Open 2026 : जोकोविचच स्वप्न अधुरेच! फायनल जिंकत 'करिअर ग्रँड स्लॅम'सह अल्काराझनं रचला इतिहास
Australian Open Final 2026 Carlos Alcaraz Beats Novak Djokovic To Win 1st Aus Open Title : ऑस्ट्रेलियन ओपन २०२६ स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात सर्बियन दिग्गज टेनिस स्टार नोव्हाक जोकोविच आणि स्पेनचा उदयोन्मुख स्टार कार्लोस अल्काराझ यांच्यात जेतेपदासाठी ऐतिहासिक लढत रंगल्याचे पाहायला मिळाले. या लढतीत दहा वेळचा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील विजेत्या जोकोविचला पराभूत करत कार्लोस अल्काराझनं पहिल्यांदा ही स्पर्धा जिंकत नवा इतिहास रचला आहे. दुसरीकडे जोकोविचचे विक्रमी २५ वे ग्रँड स्लॅम जिंकण्याचं स्वप्न पुन्हा एकदा अधुरं राहिले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मेलबर्नच्या कोर्टवर अनुभवी जोकोविचनं पहिल्या सेट ६-२ असा जिंकत ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील फायनलमध्ये अपराजित राहण्याचा आपला विक्रम कायम ठेवण्याचे संकेत दिले होते. पण त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये तो कमी पडला. युवा अल्काराझनं दमदार कमबॅक करत दुसरा सेट ६-२ आणि तिसरा सेट ६-३ असा आपल्या नावे करत 'करिअर ग्रँडस्लॅम'च्या दिशेनं पाऊल टाकले. चौथ्या सेटमध्ये जोकोनं तगडी फाइट दिली. पण काही चुका त्याला या सेटमधील विजयासह विक्रमी ग्रँड स्लॅमपासूनही दूर घेऊन गेल्या. चौथा सेट ७-५ असा जिंकत अल्काराझनं करिअर ग्रँडस्लॅम पूर्ण करत नवा इतिहास रचला. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या फायनलमध्ये जोकोविचला पराभूत करणारा तो पहिला टेनिस स्टार ठरला. एवढेच नाही तर सर्वात कमी वयात चारही ग्रँडस्लॅम जिंकण्याचा पराक्रम त्याने आपल्या नावे केला आहे.
अल्काराझनं रचला इतिहास, असा पराक्रम करणारा ठरला सर्वात युवा टेनिसपटू
कार्लोस अल्काराझ २२ वर्षे २७२ दिवस वयात किमान एकदा चारही ग्रँडस्लॅम जिंकणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. याआधी हा विक्रम अमेरिकन टेनिस दिग्गज डॉन बड्ज यांच्या नावावर होता. त्यांनी १९३८ च्या फ्रेंच चॅम्पियनशिपमध्ये वयाच्या २२ वर्षे ३६३ दिवसांचा असताना करिअर ग्रँडस्लॅम पूर्ण केले होते.
आतापर्यंतच्या कारकिर्दीतील सातवे जेतेपद
ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील जेतेपदासह अल्कराझनं आतापर्यंतच्या आपल्या कारकिर्दीत सात ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. विम्बल्डनची दोन विजेतेपदे (२०२३, २०२४), फ्रेंच ओपनची दोन विजेतेपदे (२०२४, २०२५) आणि यूएस ओपन स्पर्धेत त्याने (२०२२, २०२५) दोन वेळा आपली छाप सोडली होती.