'Jio' जी भर के नाही, तर पैसे भर के... आता कस्सं वाटतंय?

By सायली शिर्के | Published: October 14, 2019 04:15 PM2019-10-14T16:15:49+5:302019-10-14T16:30:09+5:30

रिलायन्स जिओने दिवाळीआधी आपल्या युजर्सना दणका दिला.

youth opinion about Reliance Jio stops free voice calls | 'Jio' जी भर के नाही, तर पैसे भर के... आता कस्सं वाटतंय?

'Jio' जी भर के नाही, तर पैसे भर के... आता कस्सं वाटतंय?

googlenewsNext

काळानुसार सर्वच गोष्टी बदलल्या... पत्राची जागा मेसेजने घेतली, एकमेकांना भेटण्यासाठी आधी प्रवास करावा लागायचा आता व्हिडीओ कॉलवर क्षणात भेट होते. कुलाब्यापासून कॅलिफोर्नियापर्यंत सर्वच कनेक्ट झाले... ही सारी किमया घडवली ती स्मार्टफोनने. खरंतर स्मार्टफोन हा जगण्याचा अविभाज्य भाग झालाय असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. स्मार्टफोन म्हटला की इंटरनेट आलंच. 'Jio' जी भर के म्हणत इंटरनेटच्या जगात क्रांती झाली. एक जीबी डेटा जपून जपून वापरणाऱ्यांना जिओने इंटरनेट आणि फ्री कॉलिंगची सुविधा उपलब्ध करून दिली.

कमी पैशात बऱ्याच सुविधा मिळाल्या की आपसुकच त्या गोष्टीला जास्त भाव येतो. जिओच्याबाबतीतही तेच झालं. 10 पैकी 8 मंडळी तरी जिओ वापरणारी भेटतात. मात्र रिलायन्स जिओने दिवाळीआधी आपल्या युजर्सना दणका दिला. आपली कॉलिंग पॉलिसी बदलून फ्री कॉलिंगची सुविधा बंद केली. जिओ युजर्सना आता जिओ व्यतिरिक्त अन्य युजर्सना कॉल करण्यासाठी प्रति मिनिट 6 पैसे मोजावे लागणार आहेत. या निर्णयामुळे जिओ युजर्स नाराज झाले आहेत. तर इतर कंपन्यांनीही याचाच फायदा घेत युजर्सना आकर्षित करण्यासाठी ऑफर्स द्यायला सुरुवात केली आहे. जिओ सध्या जिव्हाळ्याचा विषय झाला आहे. अन्न, वस्त्र, निवारा आणि इंटरनेट लागतंच असं म्हणणारी आजची तरुणाई या निर्णयावर काय म्हणतेय पाहूया...

जिओच्या ऑफर्स ऐकून जिओचं सिमकार्ड घेतलं. नेटपॅकही चांगला होता. मात्र आता जिओने फ्री कॉलिंग बंद केल्याचं सांगून धक्का दिला आहे. जिओवरून अन्य युजर्सना कॉल केल्यास चार्जेस लागणार आहेत. जिओच्या फ्री कॉलिंगची सवय लागली होती. ग्राहकांना जिओने अशा पद्धतीने नाराज करायला नको होतं. 

- मयुरी सपकाळ

फ्री कॉलिंगची सुविधा बंद केल्याचा फटका जिओलाच बसणार आहे. कारण यामुळे अनेक युजर्स नाराज झाले आहे. जिओची फ्री कॉलिंग सुविधा कधीपर्यंत उपलब्ध आहे?, व्हॉईस कॉलिंगचा रिचार्ज प्लॅन किती रुपये असणार?, तो प्लॅन नेमका कसा अ‍ॅक्टिवेट करायचा? असे असंख्य प्रश्न सध्या जिओ युजर्सना पडले आहेत. साहजिकच यामुळे युजर्स दुसऱ्या कंपनींचा प्लॅन निवडतील.

- अजिंक्य भोईर 


'Jio' जी भर के असं म्हणण्याऐवजी जिओ पैसे भर के असं म्हणायची वेळ आली आहे. कॉलिंग पॉलिसी बदलल्यामुळे युजर्सना आता जिओ व्यतिरिक्त अन्य युजर्सना कॉल करण्यासाठी प्रति मिनिट 6 पैसे मोजावे लागणार आहेत. आधीच सर्वच गोष्टी महाग झालेल्या असताना आता रिचार्ज पॅकसाठी देखील जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार आहेत. 

- समृद्धी सावंत

जिओने अशा पद्धतीने अचानक फ्री कॉलिंगची सुविधा बंद करणं चुकीचं आहे. जिओ वापरणाऱ्या युजर्सची संख्या लक्षात घेऊन अन्य काहीतरी मार्ग काढायला हवा होता. जर फ्री कॉलिंग नसेल तर आता जिओ वापरून काय फायदा? जी कंपनी बेस्ट प्लॅन देणार त्यांच्याच यापुढे वापर करणार. 

- विकास देसाई

इंटरनेटचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळेच चांगला नेट पॅक देणाऱ्यांकडे युजर्स आकर्षित होतात. फ्री कॉलिंगची सुविधा बंद झाल्यामुळे ट्विटरवर देखील BoycottJio हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आहे. जिओ वर टीका सुरू झाली आहे. जिओचं फ्री कॉलिंग बंद झाल्यामुळे आता खिशाला कात्री लागणार आहे. 

-  निकिता शिंदे

 

Web Title: youth opinion about Reliance Jio stops free voice calls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.