तुमचा iPhone हॅक तर झाला नाही ना? 'या' ४ गोष्टी दिसताच समजा कुणीतरी करतंय तुमची हेरगिरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 13:46 IST2026-01-09T13:46:14+5:302026-01-09T13:46:58+5:30
तुमचा फोन हॅक झाला असेल, तर तुमची खासगी माहिती, बँक डिटेल्स आणि वैयक्तिक फोटो धोक्यात येऊ शकतात.

तुमचा iPhone हॅक तर झाला नाही ना? 'या' ४ गोष्टी दिसताच समजा कुणीतरी करतंय तुमची हेरगिरी
आयफोन सुरक्षिततेच्या बाबतीत जगात अव्वल मानला जातो. मात्र, आता सायबर गुन्हेगार इतके प्रगत झाले आहेत की त्यांनी आयफोनच्या सुरक्षेतही छिद्र पाडणारे 'स्पायवेअर' तयार केले आहेत. तुमचा फोन हॅक झाला असेल, तर तुमची खासगी माहिती, बँक डिटेल्स आणि वैयक्तिक फोटो धोक्यात येऊ शकतात. आयफोन हॅक झाला आहे की नाही, हे ओळखण्यासाठी काही विशिष्ट संकेत मिळतात. जर तुमच्या फोनमध्ये खालील ४ गोष्टी घडत असतील, तर ही धोक्याची घंटा समजा.
बॅटरी अचानक लवकर संपणे
जर तुमच्या आयफोनची बॅटरी पूर्वीपेक्षा खूप लवकर डिस्चार्ज होत असेल, तर हे हॅकिंगचे लक्षण असू शकते. हॅकर्सनी तुमच्या फोनमध्ये टाकलेले मालवेअर किंवा स्पायवेअर बॅकग्राउंडला सतत सुरू असतात. तुम्ही फोन वापरत नसलात तरी हे सॉफ्टवेअर तुमची माहिती चोरण्यासाठी बॅटरीचा वापर करत राहतात, ज्यामुळे बॅटरी वेगाने संपते.
फोन न वापरताही गरम होणे
फोन चार्जिंगला नसताना किंवा त्यावर कोणतेही गेमिंग किंवा व्हिडिओ एडिटिंग सुरू नसतानाही तो अचानक गरम होत असेल, तर सावध व्हा. स्पायवेअरमुळे फोनच्या प्रोसेसरवर एकाच वेळी अनेक प्रक्रिया सुरू होतात, ज्याचा ताण वाढल्यामुळे फोन गरम होऊ लागतो.
स्क्रीनवरील 'ती' वॉर्निंग लाइट
आयफोनमध्ये सुरक्षेसाठी एक खास फिचर आहे. जेव्हा कॅमेरा सुरू असतो तेव्हा स्क्रीनच्या कोपऱ्यात हिरवा ठिपका दिसतो आणि जेव्हा मायक्रोफोन सुरू असतो तेव्हा नारंगी ठिपका दिसतो. जर, तुम्ही कॅमेरा किंवा माईक वापरत नसाल आणि तरीही हे ठिपके सतत दिसत असतील, तर याचा अर्थ कुणीतरी गुपचूप तुमचे बोलणे ऐकत आहे किंवा तुमचे व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे.
मोबाईल डेटाचा अनाकलनीय वापर
तुमचा दररोजचा डेटा प्लॅन लवकर संपत आहे का? मालवेअरला तुमची माहिती हॅकरच्या सर्व्हरपर्यंत पोहोचवण्यासाठी इंटरनेटची गरज असते. जर तुम्ही काहीही डाऊनलोड न करता डेटा संपत असेल, तर आयफोनच्या 'सेटिंग्स'मधील 'सेल्युलर' विभागात जाऊन तपासा. तिथे एखादे संशयास्पद ॲप जास्त डेटा वापरत असेल, तर त्याला तातडीने अनइंस्टॉल करा.