अलर्ट! पैसे दुप्पट करण्याची हाव; एक मेसेज अन् गमावली आयुष्यभराची कमाई, करू नका 'ही' चूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 14:03 IST2025-12-28T14:02:57+5:302025-12-28T14:03:23+5:30
सायबर फसवणुकीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एका व्यक्तीने बनावट स्टॉक आणि IPO मध्ये पैसे गुंतवून आपले १६ लाख रुपये गमावले आहेत.

अलर्ट! पैसे दुप्पट करण्याची हाव; एक मेसेज अन् गमावली आयुष्यभराची कमाई, करू नका 'ही' चूक
सायबर फसवणुकीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एका व्यक्तीने बनावट स्टॉक आणि IPO मध्ये पैसे गुंतवून आपले १६ लाख रुपये गमावले आहेत. हे प्रकरण गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीडित व्यक्तीने पोलीस तक्रार दाखल केली असून आपल्याला कशाप्रकारे जाळ्यात ओढण्यात आलx, याची संपूर्ण माहिती दिली. या सायबर फसवणुकीची सुरुवात एका WhatsApp मेसेजपासून झाली.
व्यक्तीला अतिशय चलाखीने एका WhatsApp ग्रुपमध्ये समाविष्ट करण्यात आलं होतं. हा ग्रुप एक 'प्रोफेशनल इन्व्हेस्टमेंट एडव्हायझरी फोरम' असल्याचं भासवण्यात आलं होतं. त्यानंतर त्याच्यासमोर अनेक खोटे दावे करण्यात आले. त्यांना सांगण्यात आलं की, ही संस्था स्टॉक मार्केट आणि IPO मध्ये गुंतवणूक करून घेते आणि त्यावर मोठा परतावा मिळवून देते.
ऑनलाईन फॉर्म भरण्यास सांगितलं
जुलै महिन्यात व्यक्तीला एक लिंक मिळाली, ज्यामध्ये त्यांना एक ऑनलाईन फॉर्म भरण्यास सांगण्यात आलं. फॉर्म सबमिट केल्यानंतर, त्यांना एक विशिष्ट मोबाईल एप इन्स्टॉल करण्यास सांगितलं गेलं. सुरुवातीला ५,००० रुपयांची गुंतवणूक केली, ज्यावर त्यांना ५,२४५ रुपयांचा परतावा मिळाला. यानंतर त्यांचा विश्वास बसला की हे काम अधिकृत आहे आणि पुढेही पैसे गुंतवता येतील.
१८ लाखांचं कर्ज
विश्वास बसल्यानंतर व्यक्तीने सायबर गुन्हेगारांना सांगितलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये एकूण १६ लाख रुपये ट्रान्सफर केले. काही काळानंतर, जेव्हा व्यक्तीला त्यांच्या वॉलेटमध्ये १८ लाख रुपयांचे 'लोन' दिसलं, तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. आपली फसवणूक होत असल्याचं लक्षात येताच त्यांनी गुंतवलेले पैसे काढण्याचा प्रयत्न केला.
९ लाख रुपयांची अतिरिक्त मागणी
जेव्हा ते पैसे काढू शकले नाहीत, तेव्हा त्यांनी सायबर स्कॅमर्सच्या नंबरवर कॉल केला. मात्र, पैसे परत करण्याऐवजी चोरांनी 'प्रोसेसिंग फी'च्या नावाखाली अतिरिक्त ९ लाख रुपयांची मागणी केली. या मागणीनंतर व्यक्तीला खात्री पटली की त्यांची फसवणूक झाली आहे आणि त्यांनी तात्काळ पोलीस तक्रार दाखल केली.
पोलिसांनी दाखल केला गुन्हा
पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. जर तुम्हालाही अशाच प्रकारे कोणत्याही अनोळखी WhatsApp ग्रुपमध्ये समाविष्ट केले जात असेल आणि मोठ्या कमाईचे आमिष दाखवले जात असेल, तर सतर्क राहा. ही सायबर गुन्हेगारांची जुनी पद्धत आहे, ज्याला आतापर्यंत अनेक लोक बळी पडले आहेत.