“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 17:47 IST2025-05-13T17:46:41+5:302025-05-13T17:47:02+5:30

WhatsApp Scam: अनोळखी क्रमांकावरून आलेला मेसेज आणि इमेज उघडून पाहताच बँक खात्यातून होत आहेत पैसे गायब; काय आहे हा स्कॅम आणि त्यावर उपाय? वाचा!

WhatsApp Scam: “Do you know this person?” This message and photo on WhatsApp can empty your bank account | “इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं

“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं

आपण लहान मुलांना शिकवतो, समजावतो, की अनोळखी लोकांनी काही दिले तर खायचे नाही, कोणी बोलायला आले तर बोलायचे नाही, कोणी बोलावले तर जायचे नाही. ही सूचना आपण त्यांना देतो आणि स्वतःच विसरतो! सध्या WhatsApp वर एक नवीन स्कॅम धुमाकूळ घालतोय, ज्यामुळे लोकांचे बँक अकाउंट क्षणार्धात रिकामे होत आहे. काय आहे तो स्कॅम आणि त्यावर कोणते उपाय आहेत ते जाणून घेऊ!

पूर्वी घरफोडी व्हायची, बँक लुटली जायची, आता चोरांना नवनव्या पळवाटा मिळाल्या आहेत. इंटरनेट वापरत असलेले जवळपास सगळेच ग्राहक सोशल मीडिया आणि मोबाईल बँकिंग करतात. बँक खाते, मोबाईल नंबरशी जोडलेले असल्यामुळे चोरांचे फावते. ते एखाद्या अनोळखी क्रमांकावर लिंक पाठवतात, ज्यावर उत्सुकतेने आपण क्लिक करताच आपल्या मोबाईलचा ते ताबा मिळवतात आणि आपल्या डोळ्यादेखत बँक अकाउंट रिकामे करतात. 

सध्या WhatsApp वर असाच एक स्कॅम सुरु आहे, तो म्हणजे अनोळखी क्रमांकावरून फोटो पाठवून 'तुम्ही यांना ओळखता का?' असा मेसेज येतो. उत्सुकतेने आपण फोटो डाउनलोड करतो आणि फोटो डाउनलोड करताच आपल्या मोबाईल मध्ये मालवेअर व्हायरसचा शिरकाव होतो आणि आपल्या सगळ्या माहितीचा स्रोत सायबर गुन्हेगारांसाठी खुला होतो. आपले पर्सनल डिटेल्स, फोटो, सोशल मीडिया अकाउंट, बँक अकाउंट, OTP असे सगळे डिटेल्स समोरच्या व्यक्तीला न मागता मिळतात. परिणामी आपण आपल्या बँकेशी संपर्क करण्याच्या आत हे गुन्हेगार पैसे ट्रान्सफर करून पसार होतात. 

अलीकडेच एका व्यक्तीला हा अनुभव आला. त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून सातत्याने फोन येत होता. त्यांनी तो रिसिव्ह केला नाही. दुपारी दीड वाजता त्यांच्या WhatsApp वर एका वृद्ध माणसाचा फोटो पाठवण्यात आला आणि त्याखाली 'तुम्ही यांना ओळखता का?' असा मेसेज आला. उत्सुकतेने त्यांनी तो फोटो डाउनलोड करून पाहिला, तर पुढच्या काही मिनिटात त्यांचे दोन लाख रुपये बँकेतून काढले गेल्याचा मेसेज मिळाला. 

सायबर तज्ज्ञ सांगतात, हा स्कॅम  .gif, .jpg, .png, .mp3, .mp4, PDFs अशा फॉर्मॅटमध्ये व्हायरस जोडून केला जातो. ज्यामार्गे मालवेअर तुमच्याही नकळत फोन मध्ये डाउनलोड होतो. तसेच स्टेगनोग्राफी तंत्रज्ञानाच्या मदतीने एखाद्या व्यक्तीच्या आवाजाची कॉपी करून व्हॉईस मेसेज अथवा फोन कॉल केला जातो. ज्यामुळे एक असा भयंकर कोड असतो, जो व्हॉईस मेसेज डाउनलोड करताच तुमच्या मोबाइलचा ताबा घेतो. 

व्हॉट्सअॅपच्या प्रवक्त्याने सांगितले की, स्कॅमर सतत त्यांच्या पद्धती बदलत असतात, त्यामुळे आपण सतर्क राहणे महत्त्वाचे आहे. अशावेळी संशयास्पद अकाउंट्स ब्लॉक करण्याचा आणि त्यांची तक्रार करण्याचा सल्ला दिला आहे, तसेच अज्ञात नंबरवरून येणाऱ्या प्रतिमा, व्हिडिओ डाउनलोड करू नका किंवा लिंकवर क्लिक करू नका आणि आपल्या मोबाईलवर पुढे दिल्याप्रमाणे सेटिंगमध्ये बदल करून घ्या. 

WhatsApp च्या सेटिंगवर जाऊन स्टोरेज आणि डेटा या ऑप्शनवर क्लिक करून ऑटो डाउनलोड होणारे फोटो, व्हिडीओ आणि व्हॉइस मेसेजचा ऑप्शन बंद करा. 

दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनोळखी क्रमांकावरून येणारे फोटो, व्हिडीओ डाउनलोड करू नका.


 

Web Title: WhatsApp Scam: “Do you know this person?” This message and photo on WhatsApp can empty your bank account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.