व्हॉट्स अॅप घेऊन येतंय सगळ्यांनाच हवहवसं वाटणारं 'ते' फीचर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2018 18:49 IST2018-02-07T18:48:52+5:302018-02-07T18:49:39+5:30
आपल्या यूजर्सना काय हवंय, हे पाहून व्हॉट्स अॅप सतत नवनवे प्रयोग करत आलंय. आता ते एक असं फीचर घेऊन येताहेत, ज्यामुळे इन्स्टंट मेसेजिंग अॅप ही त्यांचीच ओळख बदलून जाणार आहे.

व्हॉट्स अॅप घेऊन येतंय सगळ्यांनाच हवहवसं वाटणारं 'ते' फीचर
नवी दिल्लीः आपल्या यूजर्सना काय हवंय, हे पाहून व्हॉट्स अॅप सतत नवनवे प्रयोग करत आलंय. आता ते एक असं फीचर घेऊन येताहेत, ज्यामुळे इन्स्टंट मेसेजिंग अॅप ही त्यांचीच ओळख बदलून जाणार आहे. गेले बरेच महिने चर्चेत असलेल्या ग्रूप व्हिडिओ कॉलिंग या फीचरचं काम अंतिम टप्प्यात आल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून समजतं.
ग्रूप व्हिडिओ कॉलिंग या फीचरची चाचणी सुरू असून सुरुवातीला अँड्रॉइड फोनवर ते दिलं जाणार असल्याची माहिती डब्ल्यूए बीटा इन्फोने दिली आहे. नेमकं कधीपर्यंत हे काम पूर्ण होईल, हे त्यांनी स्पष्ट केलेलं नाही. परंतु, त्यांनी दिलेला स्क्रीन शॉट पाहिला, तर हे फीचर वापरून चार जण एकत्र बोलू शकतात.
व्हॉट्स अॅपनं गेल्या वर्षीच व्हिडिओ कॉलिंगचं फीचर दिलं होतं. तेव्हापासूनच ग्रूप व्हिडिओ कॉलिंगचीही मागणी होत होती. आता या व्हिडिओ कॉलिंग फीचरमध्ये Add Personचा पर्याय देण्यात येणार आहे. व्हॉट्स अॅप ग्रूप कॉलिंगचा आत्ताच अनुभव घ्यायचा असेल तर त्याचं बीटा व्हर्जन तुम्ही एपीके मिरर वेबसाइटवरून डाउनलोड करू शकता. पण ते प्रत्यक्ष कधी लाँच केलं जाणार, याबद्दल व्हॉट्स अॅपकडून अद्याप कुठलाही खुलासा करण्यात आलेला नाही.