टेलिफोटो लेन्स, ZEISS कॅमेरा सेटअप; लॉन्च झाला 200MP कॅमेरावाला फोन; जाणून घ्या फीचर्स...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 19:04 IST2025-10-13T19:04:01+5:302025-10-13T19:04:51+5:30
सेल्फीसाठी 50 मेगापिक्सेल Sony LYT-828 प्रायमरी सेन्सर मिळेल!

टेलिफोटो लेन्स, ZEISS कॅमेरा सेटअप; लॉन्च झाला 200MP कॅमेरावाला फोन; जाणून घ्या फीचर्स...
दिग्गज स्मार्टफोन कंपनी Vivo ने अखेर आपली फ्लॅगशिप Vivo X300 सिरीज लॉन्च केली आहे. या सिरीजअंतर्गत कंपनीने दोन नवे स्मार्टफोन Vivo X300 आणि Vivo X300 Pro लॉन्च केले आहेत. सध्या हे फोन फक्त चीनमध्ये उपलब्ध आहेत, पण लवकरच भारतीय आणि जागतिक बाजारपेठेत लाँच होण्याची अपेक्षा आहे.
दोन्ही स्मार्टफोनमध्ये MediaTek चा नवीन Dimensity 9500 SoC प्रोसेसर दिला आहे. हे फोन Android 16 वर आधारित कंपनीच्या नवीन OriginOS 6 यूआयवर चालतात. या डिव्हाइसेसमध्ये ZEISS कंपनीचा कॅमेरा सेटअप आणि Vivo ची V3+ इमेज प्रोसेसिंग चिप दिली आहे.
कॅमेरा सेटअप
Vivo X300 मध्ये तब्बल 200 मेगापिक्सेलचा Samsung HPB प्रायमरी कॅमेरा सेन्सर दिला आहे, तर X300 Pro मध्ये 50 मेगापिक्सेल Sony LYT-828 प्रायमरी सेन्सर वापरला आहे. दोन्ही फोन्समध्ये 50 मेगापिक्सेलचा फ्रंट सेल्फी कॅमेरा मिळेल.
Vivo X300 Pro मध्ये कंपनीने 85mm 200 मेगापिक्सेल ZEISS APO टेलिफोटो कॅमेरा दिला आहे. ही लेन्स Samsung आणि MediaTek यांच्या सहकार्याने तयार करण्यात आली आहे. हा HPBlue मोठ्या आकाराचा (1/1.4 इंच) सेन्सर आहे, ज्याचा अॅपर्चर f/2.67 आहे. या कॅमेराला ZEISS T* कोटिंग देण्यात आले आहे, ज्यामुळे कलर करेक्शन आणि शार्पनेस अधिक चांगली मिळते. याला ZEISS APO सर्टिफिकेशन आहे. तसेच CIPA 5.5 स्टॅबिलायझेशन प्रणाली हाय झूम दरम्यानही अत्यंत स्पष्ट आणि स्थिर फोटो घेते.
Vivo X300 मधील कॅमेरा सेटअप
Vivo ने हाच 200 मेगापिक्सेलचा सेन्सर X300 मॉडेलमध्येही दिला आहे, पण येथे तो टेलिफोटोऐवजी प्रायमरी कॅमेरा म्हणून वापरला आहे. याचा अॅपर्चर f/1.68 आणि CIPA 4.5 स्टॅबिलायझेशन आहे. या मॉडेलमध्ये टेलिफोटो कॅमेरासाठी Sony चा 50 मेगापिक्सेल लेन्स मिळेल.
डिस्प्ले आणि बॅटरी
दोन्ही स्मार्टफोनमध्ये कंपनीने BOE Q10+ OLED 1.5K LTPO पॅनल दिला आहे. Pro मॉडेलमध्ये थोडा मोठा डिस्प्ले मिळतो. बॅटरी क्षमतेबाबत बोलायचे झाल्यास, Vivo X300 मध्ये 6,040mAh आणि X300 Pro मध्ये 6,510mAh बॅटरी दिली आहे.
किंमत
कंपनीने अद्याप किंमतीची माहिती जाहीर केलेली नाही, परंतु Vivo X200 ची भारतात सुरुवातीची किंमत ₹65,999 होती, त्यामुळे नवीन मॉडेलची किंमत अंदाजे₹70,000 च्या आसपास असू शकते.