परप्लेक्सिटीचा तांत्रिक बिघाड सोडवला, १ कोटीची नोकरी मिळाली; पालघर जिल्ह्यातल्या जितेंद्रची झाली निवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 08:22 IST2025-10-07T06:43:43+5:302025-10-07T08:22:35+5:30
परप्लेक्सिटी (एआय) या कंपनीत तांत्रिक बिघाड झाला होता. हा बिघाड सोडवून देण्याचे आवाहन कंपनीने तरुणांना केले होते. त्याला इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याने प्रतिसाद देत हा तांत्रिक बिघाड सोडवला.

परप्लेक्सिटीचा तांत्रिक बिघाड सोडवला, १ कोटीची नोकरी मिळाली; पालघर जिल्ह्यातल्या जितेंद्रची झाली निवड
लोकमत न्यूज नेटवर्क
नालासोपारा : परप्लेक्सिटी (एआय) या कंपनीत तांत्रिक बिघाड झाला होता. हा बिघाड सोडवून देण्याचे आवाहन कंपनीने तरुणांना केले होते. त्याला इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याने प्रतिसाद देत हा तांत्रिक बिघाड सोडवला. त्याची बुद्धिमत्ता आणि कौशल्य यांमुळे प्रभावित झालेल्या परप्लेक्सिटी या एआय कंपनीने लगेचच त्याला तब्बल १ कोटी ६ लाखांचे वार्षिक पॅकेज ऑफर केले आणि त्याच्या स्वप्नांना नवे पंख मिळाले.
वसईच्या विद्यावर्धिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील जितेंद्र प्रजापती या विद्यार्थ्याला परप्लेक्सिटी एआय कंपनीने गलेलठ्ठ पगाराची नोकरी देत त्याची सॉफ्टवेअर इंजिनिअर या पदासाठी निवड केली आहे. अशा प्रकारे निवड झालेला जितेंद्र हा पालघर जिल्ह्यातील पहिला विद्यार्थी ठरल्याचा दावा महाविद्यालय प्रशासनाने केला आहे. जितेंद्र प्रजापती (२१) हा भाईंदरमध्ये राहतो. तो वसईत अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. सध्या तो संगणक शाखेच्या अंतिम वर्षाला आहे.
अभियांत्रिकीतील निपुणतेची पावती
महाविद्यालयीन विद्यार्थी असलेल्या जितेंद्रची कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर पदासाठी निवड झाली आहे. जितेंद्रची झालेली निवड ही संपूर्ण महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी ठरणार आहे. अशा प्रतिष्ठित कंपनीतून मिळणारे हे दरवर्षीचे एक कोटी रुपयांपेक्षा जास्त पॅकेज म्हणजे जितेंद्र यांच्या कठोर परिश्रम, दृढनिश्चय आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील त्याच्या निपुणतेची पावती आहे, असे कॉलेजच्या प्राचार्य डॉ. राकेश हिमते यांनी सांगितले.