धक्कादायक! आयफोन X चा स्फोट; अपडेट केल्यानंतरची घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 19:02 IST2018-11-14T18:59:57+5:302018-11-14T19:02:46+5:30
फोन केवळ 10 महिने जुना. अॅपल या घटनेची चौकशी करत आहे.

धक्कादायक! आयफोन X चा स्फोट; अपडेट केल्यानंतरची घटना
अॅपलने नुकतीच लाँचे केलेली आयओएस 12.1 अपडेट करताना दहाव्या वर्षपूर्तीनिमित्त लाँच केलेला iPhone X चा स्फोट झाला. ही घटना वॉशिंग्टनच्या फेडरल वेमध्ये घडली आहे. हा फोन केवळ 10 महिने जुना असल्याचे ग्राहकाने सांगितले असून अॅपल या घटनेची चौकशी करत आहे.
iPhone X हा फोन लाँचिंगनंतर जास्त किंमत आणि त्यानंतर त्यातील समस्यांमुळे वादग्रस्त ठरला होता. जेव्हा हा फोन फुटला तेव्हा युजरने कंपनीच्या केबल आणि चार्जरला लावून चार्जिंग सुरु केले होते. फोनचा स्फोट झाल्यानंतर त्याने लगेचच चार्जिंग केबल काढून टाकली. त्याआधी फोन गरम झाला होता आणि त्यातून धूर निघू लागल्याचे या युजरने सांगितले आहे. या घटनेची माहिती त्याने लगेचच अॅपलला कळविली. तसेच हा फोन कंपनीला पाठविण्यासही सांगितले आहे.
या युजरने नुकतीच आयओएस 12.1 अपडेट केली होती. गेल्या वर्षी Samsung च्या Galaxy Note 9 मध्येही असाच स्फोट झाला होता. यानंतर सलग काही दिवस अशा घटना घडल्या. विमानातही या मोबाईलचा स्फोट झाला होता. शेवटी या फोनला विमान प्रवासात बंदी आणण्यात आली होती. नंतर कंपनीने या फोनचे उत्पादनच बंद केले होते. यामध्ये सॅमसंगचे मोठे नुकसानही झाले होते.