जगात कुठेही वस्तू पाठवा फक्त तासाभरात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 07:12 IST2025-10-08T07:12:18+5:302025-10-08T07:12:28+5:30
‘इन्व्हर्जन’चे को-फाउंडर जस्टिन फियास्केटी आणि ऑस्टिन ब्रिग्स यांच्या मते, आर्क हे एक क्रांतिकारी लॉजिस्टिक्स प्लॅटफॉर्म आहे, जे अंतराळात नेटवर्क तयार करून पृथ्वीला आपल्या ‘नजरेखाली’ ठेवेल.

जगात कुठेही वस्तू पाठवा फक्त तासाभरात!
जग कधीचंच एक छोटं ‘खेडं’ झालं आहे. ते दिवसेंदिवस इतकं जवळ येत आहे आणि जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातला संपर्क आता इतका सहज झाला आहे की काही वर्षांपूर्वी आपण त्याची साधी कल्पनाही करू शकलो नसतो. आता त्याच्याच पुढचं पाऊल म्हणजे जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात तुम्हाला एखादी वस्तू पाठवायची असेल तर अगदी तासाभरात ती पाठवणं आणि अपेक्षित ठिकाणी पोहोचणं शक्य झालं आहे!
अमेरिकी एरोस्पेस आणि डिफेन्स कंपनी ‘इन्व्हर्जन’नं जगातील पहिलं असं अनोखं डिलिव्हरी यान लाँच केलं आहे, जे पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणी फक्त एका तासाच्या आत आवश्यक सामान पोहोचवू शकतं. २२७ किलो वजनाचं सामान या यानातून एकावेळी पाठवलं जाऊ शकतं. या यानाचं नाव आहे ‘आर्क’ आणि ताशी तब्बल २४,७०० किलोमीटर वेगानं ते प्रवास करू शकतं. हे यान फक्त ८ फूट उंच आणि ४ फूट रुंद आहे. अंतराळातून परतताना स्वतःच स्वत:ला ते कंट्रोल करतं आणि पॅराशूटच्या साहाय्यानं थेट लॅण्ड होतं. त्यासाठी रनवेचीही अजिबात गरज नाही. अर्थातच हे यान केवळ सामान वाहतुकीसाठी आहे. यात माणसांना किंवा अंतराळवीरांना नेण्याची सोय नाही.
सध्या स्पेसएक्ससारख्या कंपन्यांच्या सॅटेलाइट मिशनसाठी स्पेसक्राफ्ट लाँचिंग, परतीचा प्रवास आणि इतर खर्च मिळून सुमारे ५५ लाख डॉलर (सुमारे ४८ कोटी रुपये) इतका खर्च येतो. त्याच्या तुलनेत ‘आर्क’चं ऑपरेशन अतिशय स्वस्त आहे, कारण ते पूर्णपणे रियुजेबल आहे.
‘इन्व्हर्जन’नं आर्कसाठी स्वतंत्र युनिट उभारलं आहे. हे यान नीट चालतं की नाही, अपेक्षित ठिकाणी, अपेक्षित वेळी डिलिव्हरी पोहोचते की नाही यासदंर्भात कंपनीनं आतापर्यंत किमान डझनभर ‘ड्रॉप टेस्ट’ही घेतल्या आहेत आणि या प्रत्येक चाचणीत ते शंभर टक्के यशस्वी झालं आहे. यासंदर्भात एरोडायनॅमिक मॉडेलिंगही पूर्ण झालं आहे. आर्क या यानाला आधीच पृथ्वीच्या कक्षेत ठेवलं जाईल आणि जेव्हा गरज भासेल, तेव्हा एका तासाच्या आत जगभर कुठेही आवश्यक डिलिव्हरी पोहोचवली जाईल!
‘इन्व्हर्जन’चे को-फाउंडर जस्टिन फियास्केटी आणि ऑस्टिन ब्रिग्स यांच्या मते, आर्क हे एक क्रांतिकारी लॉजिस्टिक्स प्लॅटफॉर्म आहे, जे अंतराळात नेटवर्क तयार करून पृथ्वीला आपल्या ‘नजरेखाली’ ठेवेल.
यामुळे अनेक गोष्टी शक्य होतील. नैसर्गिक आपत्ती, युद्ध किंवा महामारीसारख्या परिस्थितीत, औषधं, लस, वैद्यकीय उपकरणं एका तासात जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात पोहोचवणं शक्य होईल. लष्करी वापरासाठी तातडीचं साहित्य, ड्रोन, टेक्नॉलॉजी उपकरणं त्वरित पोहोचवता येऊ शकेल. यामुळे युद्धनीतीतही क्रांती घडू शकेल. सध्याचा आंतरराष्ट्रीय मालवाहतूक उद्योग समुद्री मार्ग, हवाई मार्गावर आधारित आहे. आर्कसारख्या यानामुळे भविष्यात पारंपरिक कार्गो शिपिंग हळूहळू कालबाह्य होऊ शकतं. पुनर्वापरक्षम डिझाइनमुळे लॉजिस्टिक्स खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होईल. विशेषतः महागड्या, हाय-प्रायोरिटी वस्तूंसाठी ही पद्धत अधिक उपयुक्त ठरेल. या संकल्पनेमुळे येणाऱ्या काळात अंतराळाचा वापर केवळ संशोधनापुरता मर्यादित न राहता दैनंदिन जीवनाचा तो अविभाज्य भाग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.