आयफोन एअरपेक्षाही पातळ; सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड ७ स्मार्टफोनची मार्केटमध्ये हवा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 17:41 IST2025-10-03T17:35:12+5:302025-10-03T17:41:58+5:30
Thinnest Foldable Smartphone: सॅमसंगने यावेळी त्यांचा सर्वात पातळ फोल्डेबल स्मार्टफोन बाजारात आणला आहे, जो थेट आयफोन एअरला टक्कर देतोय.

आयफोन एअरपेक्षाही पातळ; सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड ७ स्मार्टफोनची मार्केटमध्ये हवा!
सॅमसंगचा नवीन फोल्डेबल स्मार्टफोनसॅमसंग गॅलेक्सी फोल्ड ७ ने लॉन्च होताच बाजारात मोठी हवा केली आहे. सॅमसंगने यावेळी त्यांचा सर्वात पातळ फोल्डेबल स्मार्टफोन बाजारात आणला आहे, ज्याने टिकाऊपणा आणि डिझाइनच्या बाबतीत नवीन बेंचमार्क सेट केले आहेत.
गॅलेक्सी फोल्ड ७ चे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे त्याची जाडी आहे. कंपनीचा दावा आहे की हा स्मार्टफोन उघडल्यावर नुकत्याच लॉन्च झालेल्या आयफोन एअरपेक्षाही पातळ आहे. गॅलेक्सी फोल्ड ७ उघडल्यावर ४.२ मिमी आहे. तर, आयफोन एअरची जाडी मिमी ५.६ इतकी आहे. विशेष म्हणजे, फोल्ड केल्यानंतरही गॅलेक्सी फोल्ड ७ हा सामान्य स्मार्टफोनइतकाच जाड राहतो, ज्यामुळे तो वापरकर्त्यांना फोल्डेबल फोनसारखा जाणवत नाही.
लोकप्रिय युट्यूबर झॅक नेल्सन (JerryRigEverything) यांनी गॅलेक्सी फोल्ड ७ ची टिकाऊपणा चाचणी (Durability Test) केली, ज्यात हा फोन यशस्वी झाला. झॅकने फोन फोल्ड आणि अनफोल्ड करून दोन्ही प्रकारे वाकवण्याचा प्रयत्न केला. हा फोन फोल्ड केल्यानंतरही तुटला नाही किंवा वाकला नाही. तो उघडल्यानंतर दुसऱ्या दिशेने वाकवण्याचा प्रयत्न केला असता, तो यशस्वी ठरला. एक्स्ट्रीम बेंड टेस्टदरम्यान फोनची स्क्रीन थोडीशी खराब झाली असली, तरी ती सुरूच राहिली. स्क्रॅच चाचणीतही फोनने चांगली कामगिरी केली. कंपनीने फोनला मजबूत बनवण्यासाठी आर्मर अॅल्युमिनियम वापरले आहे.
सॅमसंग कंपनीने गॅलेक्सी फोल्ड ७ बद्दल एक मोठा दावा केला आहे. हा फोन ५ लाख वेळा फोल्ड आणि अनफोल्ड करता येतो. याचा अर्थ, जर तुम्ही तो दररोज १०० वेळा फोल्ड-अनफोल्ड केला, तर तो १० वर्षे टिकू शकतो. या फोनला ७ वर्षांपर्यंत सॉफ्टवेअर अपडेट्स देखील मिळतील.