Nokia चा नवा गेम प्लॅन; मोबाइल विक्री घटली, पण नफा वाढला; कारण काय..?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 15:24 IST2025-10-09T15:23:17+5:302025-10-09T15:24:18+5:30
स्मार्टफोन मार्केटमध्ये अपयशी ठरुनही Nokia बंपर कमाई करतोय.

Nokia चा नवा गेम प्लॅन; मोबाइल विक्री घटली, पण नफा वाढला; कारण काय..?
एकेकाळी मोबाईल मार्केटवर राज्य करणारा Nokia ब्रँड आता जवळजवळ गायब झाला आहे. तुम्हाला बाजारात फार क्वचितच नोकियाचा फोन मिळेल. आश्चर्याची बाब म्हणजे, मोबाइल विक्री घटूनही नोकिया कंपनीचा नफा सातत्याने वाढत आहे. नोकिया सध्या भारतात टेलिकॉम इक्विपमेंट आणि नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काम करत आहे. यामध्ये 5G आणि 4G रेडिओ, ऑप्टिकल नेटवर्क आणि डेटा सेंटर सोल्यूशन्स प्रदान करणे समाविष्ट आहे.
मनी कंट्रोलला दिलेल्या मुलाखतीत कंपनीचे इंडिया हेड तरुण छाब्रा यांनी सांगितले की, 2026 पर्यंत नोकियाची महसुलात मोठी झेप अपेक्षित आहे. तिन्ही टेलिकॉम ऑपरेटर (जिओ, एअरटेल आणि व्हीआय) ग्रामीण आणि लहान शहरांमध्ये 4जी आणि 5जी सेवा सुरू करत असल्याने, डेटाची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आणि एआरपीयू (प्रति वापरकर्ता सरासरी महसूल) वाढवण्यासाठी कंपन्या 5 जी सेवांवर लक्ष केंद्रित करत आहेत.
त्यांनी पुढे सांगितले की, नोकिया सध्या नियमित प्रकल्प आणि ऑप्टिकल प्रकल्पांवर काम करत आहे. हे प्रकल्प संरक्षण क्षेत्रात आणि खाजगी क्षेत्रात राबवले जात आहेत. संरक्षण, रेल्वे, बंदरे, खाणकाम आणि उत्पादन यासारख्या क्षेत्रात खाजगी नेटवर्क आणि ऑटोमेशनची मागणी वेगाने वाढेल, असे मतही छाब्रा यांनी व्यक्त केले.
6G साठी तयारी सुरू आहे
6G कनेक्टिव्हिटीबाबत छाब्रा यांनी सांगितले की, बंगळुरुमधील काही नोकिया इंजीनिअर्स यावर काम करत आहेत. येत्या काळात, आपल्याला 6G नेटवर्क दिसतील, जे केवळ सुधारित गतीच देणार नाहीत, तर ऑटोमेशनमध्येही सुधारणा करतील. क्वालकॉमचे सीईओ क्रिस्टियानो अमोन यांनी आधीच सांगितले आहे की, 2028 मध्ये भारतात 6G सेवा सुरू होतील. म्हणजेच, मोबाईल विभागात फारशी वाढ झालेली नाही, तरीही भारतातील टेलिकॉम क्षेत्रातील विस्तार (विशेषतः 5G रोलआउट) मुळे नोकियाचा महसूल वेगाने वाढत आहे.