दणदणीत फिचर्सयुक्त नोकिया ८ स्मार्टफोन बाजारात दाखल
By शेखर पाटील | Updated: September 26, 2017 14:57 IST2017-09-26T13:19:37+5:302017-09-26T14:57:42+5:30
आज नोकिया ८ या मॉडेलला लाँच करण्यात आले. हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना ‘अमेझॉन इंडिया’ या शॉपींग पोर्टलवरून खरेदीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. हे मॉडेल ग्राहकांना प्रत्यक्षात १४ ऑक्टोबरपासून मिळेल.

दणदणीत फिचर्सयुक्त नोकिया ८ स्मार्टफोन बाजारात दाखल
एचएमडी ग्लोबल कंपनीने अतिशय उत्तमोत्तम फिचर्सने सज्ज असणारा नोकिया ८ हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना ३६,९९९ रूपये मूल्यात सादर केला आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतीय बाजारपेठेत नोकिया फ्लॅगशीप मॉडेल लाँच करणार असल्याची चर्चा सुरू होती. यातच नोकिया ब्रँडची मालकी असणार्या एचएमडी ग्लोबल कंपनीने २६ सप्टेबर रोजी दिल्लीत कार्यक्रमाचे आयोजन केल्यामुळे याबाबतची उत्सुकता ताणली गेली होती. या पार्श्वभूमिवर, आज नोकिया ८ या मॉडेलला लाँच करण्यात आले. हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना ‘अमेझॉन इंडिया’ या शॉपींग पोर्टलवरून खरेदीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. हे मॉडेल ग्राहकांना प्रत्यक्षात १४ ऑक्टोबरपासून मिळेल.
नोकिया ८ या मॉडेलची बॉडी अॅल्युमिनीयमपासून विकसित करण्यात आली आहे. या मॉडेलमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८३५ प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. यातील डिस्प्ले ५.२ इंच आकारमानाचा आणि क्युएचडी क्षमतेचा असून यावर कॉर्निंग गोरीला ग्लास ५ चे संरक्षक आवरण असेल. हा स्मार्टफोन ४ जीबी रॅम व ६४ जीबी स्टोअरेज आणि ६ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोअरेज अशा दोन पर्यायांमध्ये सादर करण्यात आला आहे. मात्र भारतात फक्त चार जीबी रॅमयुक्त मॉडेलच लाँच करण्यात आले आहे. हे स्टोअरेज मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे.
नोकिया ८ या मॉडेलमध्ये कार्ल झायस ऑप्टीक्सयुक्त ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यातील दोन्ही कॅमेरे १३ मेगापिक्सल्स क्षमतांचे असतील. यातील एक कॅमेरा आरजीबी तर दुसरा मोनोक्रोम या प्रकारातील असेल. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठीही यात १३ मेगापिक्सल्सचा कॅमेरा असेल. या मॉडेलची खासियत म्हणजे यात ‘बोथी’ हे फिचर प्रदान करण्यात आले आहे. याच्या अंतर्गत एकदचा रिअर आणि फ्रंट कॅमेर्यांच्या मदतीने एकचदा छायाचित्रे/व्हिडीओ घेता येतील. ही या कॅमेर्याची खासियत मानली जात आहे. यातून काढलेल्या ‘बोथी’ थेट सोशल मीडियात शेअर करण्याची सुविधा देण्यात आली आहे.
नोकिया ८ हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारे असून लवकरच याला ओरियोचे अपडेट मिळणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. तर क्विकचार्ज ३.० तंत्रज्ञानाने युक्त असणारी यातील बॅटरी ३०९० मिलीअँपिअर क्षमतेची असेल. हा स्मार्टफोन वॉटरप्रूफ आणि डस्टप्रूफ असून यात उत्तम दर्जाच्या ध्वनीच्या अनुभुतीसाठी ‘ओझो’ ही प्रणाली प्रदान करण्यात आली आहे.