भारतीय वेळेनुसार आज रात्री साडे दहा वाजता अॅपलचा आयफोन १७ सिरीज लाँचिंगचा मोठा कार्यक्रम होत आहे. यामध्ये आयफोन एअरसह आयफोन १७, प्रो आणि मॅक्स असे आयफोन व्हेरिअंट लाँच होणार आहेत. याचबरोबर एअरपॉड प्रो ३ आणि अॅपल वॉच ११ देखील लाँच होणार आहे. आयफोन १७ मध्ये ६.६ इंचाचा ओएलईडी डिस्प्ले, ए१९ चिप आणि ४८ मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा दिला जाण्याची शक्यता आहे.
यावेळचा आयफोन जरा वेगळा असणार आहे. डिझाईन, त्यातील स्पेसिफिकेशन आदी वेगळे असण्याची शक्यता आहे. एका वृत्तानुसार आयफोन १७ प्रो मॅक्समध्ये ५००० एमएएचची बॅटरी असण्याची शक्यता आहे. नवा आयफोन लाँच झाल्यावर कंपनी आयफोन १६ प्रो मॅक्स, आयफोन १६ प्रो, आयफोन १५ आणि आयफोन १५ प्लस बंद करण्याची शक्यता आहे.
तसेच आयफोन १६ सिरीजसह १५, १४ सिरीजच्या किंमती कमी होणार आहेत. गेल्या वर्षी आयफोन १६ लाँच झाला तेव्हा कंपनीने १५ सिरीजचे फोन १० ते १५ हजारांनी स्वस्त केले होते. तसेच आधीच्या आयफोनपेक्षा यंदाचा आयफोन सर्वात पातळ असू शकतो. आयफोन १७ ची सुरुवातीची किंमत सुमारे ८९,९९० रुपयांपासून सुरू होऊ शकते. आयफोन १७ एअरची किंमत सुमारे ९९,९९० रुपये असू शकते. आयफोन १७ प्रो मॅक्सची किंमत १,६४,९९० रुपयांपासून सुरू होऊ शकते.