Lokmat AI ची अद्भूत दुनिया: कृत्रिम बुद्धिमत्ता : डीप लर्निंग म्हणजे काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 13:52 IST2026-03-23T13:51:56+5:302026-03-23T13:52:46+5:30
Lokmat AI ची अद्भूत दुनिया: लहान बाळ चालायला शिकताना अनेकदा पडतं, मात्र हार मानत नाही.

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: कृत्रिम बुद्धिमत्ता : डीप लर्निंग म्हणजे काय?
Lokmat AI ची अद्भूत दुनिया: डीप लर्निंग (Deep Learning) हा मशीन लर्निंगचा एक सुरुवात भाग आहे, जो न्युरल नेटवर्क (एनएन) वर आधारित आहे. १९४० मध्ये न्युरॉन्सच्या सैद्धान्तिक मॉडेलपासून झाली, १९८० मध्ये मल्टी-लेअर न्युरल नेटवर्क्स विकसित झाले, आणि २००० नंतर वाढलेल्या डेटा आणि संगणकीय शक्तीमुळे डीप लर्निंगचा प्रचंड विस्तार झाला. आपण माणसं कशी शिकतो? लहान बाळ चालायला शिकताना अनेकदा पडतं, मात्र हार मानत नाही.
चूक झाली तरी पुन्हा प्रयत्न करतं आणि हळूहळू ते चालायला शिकतं. ह्याच पद्धतीने संगणकाला शिकवण्याचं काम डीप लर्निंग करते. डीप लर्निंग हा कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) चा एक महत्त्वाचा आणि प्रगत भाग आहे. यामध्ये संगणकाला मोठ्या प्रमाणावर माहिती (डेटा) दिली जाते. ही माहिती पाहून संगणक स्वतः पॅटर्न ओळखतो, नियम तयार करतो आणि चूक झाली तर स्वतःमध्ये सुधारणा करतो. म्हणूनच डीप लर्निंगला मराठीत अनुभवातून शिकणारी यंत्रबुद्धी असेही म्हणता येईल. आपण काही 'डीप लर्निंग'ची उदाहरणे बघूयात.
मोबाईलमधील फेस लॉक
आपण मोबाईलसमोर चेहरा धरला की तो लगेच लॉक उघडतो. कारण मोबाईलने आपला चेहरा वेगवेगळ्या कोनांत, वेगवेगळ्या प्रकाशात ओळखायला शिकलेला असतो. ही ओळखण्याची क्षमता डीप लर्निंगमुळेच येते.
यू ट्यूब, इन्स्टाग्राम आणि नेटक्लिक्स
आपल्याला आवडणारे व्हिडीओ किंवा चित्रपट आपोआप कसे सुचवले जातात? आपण काय पाहतो, आपली आवड काय? काय लवकर बंद करतो हे सगळं संगणक लक्षात ठेवतो. त्या अनुभवातूनच तो आपल्याला पुढचे पर्याय दाखवतो. हे सगळंच डीप लर्निंगच्या मदतीनेच घडतं.
गुगल असिस्टंट, सिरी, अॅलेक्सा
आपण बोललेलं समजून घेतात आणि उत्तर देतात. हे शक्य होतं कारण त्यांनी लाखो शब्द, आवाज, प्रश्नोत्तरं आधीच शिकलेली असतात. त्यांच्याकडे फिक्स पॅटर्न असतात. हे सर्व डीप लर्निंगमुळे शक्य आहे.
सद्यस्थितीत डीप लर्निंग महत्त्वाचे
आज डीप लर्निंगचा वापर शिक्षणात, वैयक्तिक अभ्यासासाठी, रुग्णालयात आजार लवकर ओळखण्यासाठी, शेतीत पिकांवरील रोग समजण्यासाठी, वाहतुकीत अपघात टाळण्यासाठी आणि हवामानाचा अंदाज घेण्यासाठी होत आहे.
भविष्यात विद्यार्थ्यांसाठी एआय शिक्षक, स्मार्ट पुस्तकं आणि स्वतःच्या गतीने शिकण्याच्या पद्धती अजून अधिक विकसित होणार आहेत. मात्र तंत्रज्ञान जितकं उपयुक्त आहे, तितकंच ते योग्य वापरणंही गरजेचं आहे.
विद्यार्थ्यांनी डीप लर्निंग आणि एआय हे शिकण्यासाठी, संशोधनासाठी आणि नवकल्पनांसाठी वापरायला हवं, फक्त करमणुकीसाठी नाही.
Deep Learning Explained
Deep Learning is a part of Artificial Intelligence where machines learn from data, recognize patterns, and improve their work by experience. It helps computers see, hear, and understand the world like humans do.
Moral - Technology is smart, but using it wisely makes our future bright.
- इंजि. अविनाश जाधव (एआय आणि टेक एज्युकेटर)